नेवासे व श्रीरामपूर ही दोन शहरे गुन्हेगारीची केंद्रे बनली आहेत, त्याची गंभीर दखल पोलीस अधीक्षक रावसाहेब िशदे यांनी घेऊन दोन्ही शहरांतील गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या भागात कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले.
अतिरिक्ति पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे यांनी अधिकारी, पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांसह कारवाई करून ३३ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. काही गुन्हेगारांकडे शस्त्रे मिळून आली आहेत. त्याला पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला.
गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ठाकरे-साळुंखे, उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक प्रकाश सपकाळे, कैलास पुंडकर, अशोक रजपूत, देवीदास पवार यांच्यासह १२ उपनिरीक्षक, १६४ पोलीस कर्मचारी, ४० गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा, नगरच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे ३२ कर्मचारी अशा सुमारे २७५ कर्मचाऱ्यांनी रात्रभर गुन्हेगारांच्या निवासस्थानी छापे टाकले. छापे सुरू असताना शहरात येणारे बेलापूर, नेवासे, संगमनेर व पुणतांबे या चारही रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली होती. वाहनांची मोठय़ा प्रमाणात तपासणी करण्यात येत होती. फकीरवाडा, डावखर रस्ता, कुंभारगल्ली, नवी दिल्ली झोपडपट्टी, सुभेदार वस्ती, गोंधवणी वडारवाडा, सूतगिरणी आदी भागांत गुन्हेगारांच्या घरावर छापे घालण्यात आले. शहरात पोलिसांच्या फिरणाऱ्या गाडय़ा आणि मोठा फौजफाटा पाहून नेमके काय झाले आहे, याचा अंदाज लोकांना येत नव्हता. सुमारे चार तास कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक स्वत: घेत होते. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये घबराट पसरली असून, शहराबाहेर असलेले अनेक गुन्हेगार पुन्हा फरार झाले आहेत. तर ऑपरेशनमधून सुटलेल्या गुन्हेगारांनी शहर सोडले आहे.
शहरात गुन्हेगारांचे केंद्र झाले असून धूम स्टाईल दागिने चोरणे, रस्ता लूट, दरोडे, खून, सुपारी घेऊन मारामारी करणे, आर्थिक फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांत शहरातील शेकडो गुन्हेगारांचा समावेश आहे. देशभर या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील पोलीस ठाण्यातून अधिकारी येथे गुन्हेगार शोधण्यासाठी येतात. स्थानिक पोलीस मात्र काहीही कारवाई करीत नाही. गृह विभागाने त्याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे अधीक्षक िशदे यांनी कोंबिंग ऑपरेशनचा आदेश दिला. दोन दिवसांपूर्वी शिंदे यांनी नगर येथे बैठक घेऊन ऑपरेशनचे नियोजन केले होते. आज त्याची अंमल बजावणी करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशनची कल्पना वाळूतस्करांना आधीच होती. त्यामुळे नाकाबंदी करूनही रात्री एकही चोरटी वाळू वाहतूक करणारी गाडी पकडली गेली नाही. बुधवारी रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या गाडय़ा बंद होत्या.
पोलिसांनी आज ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची नावे पुढीलप्रमाणे- सुमित राजू पवार, तकदीर छोटू शहा, किशोर विनायक गांगुर्डे, रवींद्र रामदास वायंडे, टिप्या अशोक बेग, अर्जुन खुशाल दाभाडे, नईम मेहबूब सय्यद, सचिन दिलीप तोडकर, सचिन रामअकबल यादव, भाऊसाहेब मधुकर गोरे, जितू जवाहर चव्हान, दीपक गोविंद नानुस्कर, उमेश रविकांत चव्हाण, अक्रम आरिफ शहा, संजय युवराज काळे, अरबाझ ऊर्फ मोहसीन शेख, सोमनाथ भाऊराव कुदळे, बादल पंडित चव्हाण, आनंद यशवंत काळे, वसीम जुमा मन्सुरी, रमेश मधुकर बोडे, संदीप ऊर्फ म्हमद्या पिंपळे, बाबासाहेब राजाराम पिंपळे, अस्लम इब्राहिम पठाण, सागर कुमावत, अक्रम नजीर शेख, संतोष सुरेश कांबळे, बबलू इब्राहिम मन्सुरी, संतोष मगर, महेंद्र शिंदे, रंगनाथ युवराज काळे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
नेवासे शहरातही पोलिसांनी रात्री कोंबिंग ऑपरेशन केले. मात्र या कारवाईत अवघे तीन गुन्हेगार मिळून आले. त्यापैकी दोघांचा पूर्वीच्या गुन्ह्यात जामीनअर्ज मंजूर झालेला असल्याने केवळ एकास अटक करण्यात आली. ऑपरेशनमध्ये पकडलेल्या गुन्हेगारांची माहिती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे तसेच राज्यभरातील पोलीस ठाण्यांना कळविण्यात आलेली आहे. ज्या पोलीस ठाण्यांना गुन्ह्याच्या तपासात गुन्हेगार हवे असतील तर ते त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. पोलिसांच्या या कारवाईत राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला नाही. अन्यही कोणी अडथळा आणला नाही. या कारवाईचे शहरात स्वागत करण्यात आले.