विदर्भात कृषीवर आधारित कारखानदारीला मोठय़ा प्रामाणात वाव असून येथे अ‍ॅग्रो बेस इंडस्ट्री आर्थिकदृष्टय़ा वरदान ठरू शकते, असे विचार सीएसआयआरचे वैज्ञानिक डॉ. व्ही. प्रकाश यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजन अंतर्गत हॉटेल प्राईड येथे आयोजित ‘व्हॅल्यू अ‍ॅडेड अ‍ॅग्रीकल्चर : सप्लाय चेन मॅनेजमेंट अ‍ॅन्ड डेअरी प्रोसेसिंग’ या विषयावरील आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमईडीसीचे अध्यक्ष दीपक नाईक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एमईडीसीचे विभागीय संचालक, नाबार्डचे सुधीर धनविजय आणि अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर उपस्थित होते.
विदर्भातील शेतकरी हा बदललेला असून होणाऱ्या परिवर्तनाला शेतकरी साद देत आहे. नागपुरी संत्र्याची ओळख आजही कायम आहे, मात्र त्यावर आधारित उद्योग निर्माण होऊ शकले नाहीत. कापसाचीही तीच अवस्था दिसून येते. मार्केटिंग चेन सिस्टम मजबूत करण्याची आता गरज असून ही सप्लाय चेन जर शासनस्तरावर मजबूत करण्यासाठी प्रयत्न झाले तर याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना होऊ शकतो, असे विचार डॉ. व्ही. प्रकाश यांनी यावेळी व्यक्त केले. अ‍ॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले व्यासपीठ मिळाले असून शेतकऱ्यांना शेतीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळत आहे. शेतीसह डेअरी, पोल्ट्री फार्म यासारख्या उद्योगांच्या माध्यमातून आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन नाबार्डचे सुधीर धनविजय यांनी केले. अ‍ॅग्रोव्हिजनचे मिशन शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणावे, कोणत्याही स्थितीत कृषी उद्योग टिकवून ठेवणे काळाची गरज असल्याचे एमईडीसीचे अध्यक्ष दीपक नाईक म्हणाले. बदलत्या हवामानानुसार पिकांची निवड करणे काळाची गरज असून फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्यावाचून राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अ‍ॅग्रोव्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर यांनी स्वागतपर भाषण केले. याप्रसंगी अनेक कृषी संशोधक हजर होते.