News Flash

अळ्या, किडे आणि कचरा.. पिण्याच्या पाण्याची नवी कहाणी!

दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांपासून दूर राहण्याचे सल्ले देणाऱ्या महापालिकेच्याच पाणीपुरवठय़ातून कचरा, किडे आणि अळ्यांचा बुजबुजाट असलेल्या पाण्याची 'भेट’ पश्चिम उपनगरातील खार येथील रहिवाशांना मिळत

| September 20, 2013 06:32 am

दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांपासून दूर राहण्याचे सल्ले देणाऱ्या महापालिकेच्याच पाणीपुरवठय़ातून कचरा, किडे आणि अळ्यांचा बुजबुजाट असलेल्या पाण्याची  ‘भेट’ पश्चिम उपनगरातील खार येथील रहिवाशांना मिळत आहे. पाण्याची गळती नेमकी कुठे होत आहे, याच्या शोधात पाणीपुरवठा विभाग अजूनही चाचपडतच असल्याने रहिवाशांनी तक्रारी करूनही दूषित पाणीपुरवठा कायमच आहे.
खार पश्चिम येथील १७ वा रस्ता, चित्रकार धुरंधर मार्गावरील इमारतींमध्ये गेले काही दिवस नळाद्वारे होणाऱ्या या किडेमिश्रित पाण्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाण्यामध्ये कचरा तसेच अळ्या सापडत असल्याची नादब्रह्म, देवज्ञान आणि एक्झॉटिक इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असून त्याचे काही नमुनेच गुरुवारी ‘लोकसत्ता’च्या हाती आले आहेत. मुंबईत हवामानातील बदलांमुळे साथीचे आजार बळावत असतानाच, दूषित पाण्यामुळे आजारांना नवे निमंत्रण मिळणार असून तशा तक्रारी वाढत असताना पालिका मात्र दूषित पाणीपुरवठय़ाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना रहिवाशांमध्ये व्यक्त होत आहे.  
खार येथील रहिवाशांना सध्या जाणवत असलेली समस्या मुंबईकरांच्या प्रत्येक भागातच जाणवत आहे. पाणीपुरवठय़ाची यंत्रणा सुधारून दूषित पाणीपुरवठय़ाचे प्रमाण कमी करण्याची पालिकेची आश्वासने केवळ वल्गना ठरल्या आहेत. २०१२-१३ या काळात पालिकेनेच केलेल्या पाहणीत गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांपैकी १९ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. गोळा केलेल्या पाण्याच्या ६०,७२६ नमुन्यामधील ११,७०० नमुने दूषित होते. त्यातील १४७४ नमुन्यांमध्ये तर इ-कोलाय विषाणूही आढळले. उलटय़ा, जुलाब तसेच शरीरातील स्नायू दुखण्यामागे इ कोलाय कारणीभूत असतात. २०११-१२ मध्ये १६ टक्के नमूने दूषित होते. त्यात तीन टक्के वाढ झाली आहे.
 फुटलेल्या जलवाहिन्यांचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, नव्या जलवाहिन्या टाकणे, मलनिसारण वाहिन्यांपासून जलवाहिन्या दूर नेणे अशा अनेक योजना पालिकेने आखल्या आहेत. मात्र कोणतीही योजना प्रभावीपणे अंमलात आणली गेली नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. एकीकडे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोटय़ावधी रुपयांचा खर्च होत असताना वाहिन्यांच्या अयोग्य नियोजनामुळे रहिवाशांना आजार पसरवणारे पाणी वापरावे लागत आहे.  
पालिकेची कबुली
याबाबत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याचे त्यांनी मान्य केले. सांडपाण्याच्या गटाराशेजारून जाणारी जलवाहिनी फुटल्याने अस्वच्छ पाणी जलवाहिनीत जात असावे, असेही हा अधिकारी म्हणाला. मात्र जलवाहिनी नेमकी कुठे फुटली हे अद्याप शोधता आलेले नाही. हा शोध सुरू असून जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतरच पाणीपुरवठा पूर्ववत होईल,’ असे पालिकेच्या एच पश्चिम विभागाचे सहाय्यक अभियंता बेंडसळे यांनी सांगितले. पाण्यात कचरा असला तरी अळ्या नाहीत, असे स्पष्टीकरणही देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी साठवलेल्या पाण्यात अळ्या स्पष्ट दिसत आहेत, असे त्यांच्या निदर्शनास आणून देताच, शोध घेतला जाईल असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 6:32 am

Web Title: larvae insects in drinking water
Next Stories
1 आशयघन चित्रपटांना आता चांगले दिवस – मतकरी
2 अभिरूप न्यायालयात रंगला ‘खराखुरा’ नकली खटला!
3 पाश्चात्य वैद्यकीय संशोधन भारतीयांनी प्रमाण मानण्याची गरज काय -डॉ. रवी बापट
Just Now!
X