गेल्या १२ वर्षांपासून उद्योजकांच्या प्रतीक्षेत असलेले नगरच्या एमआयडीसीतील ‘आयटी पार्क’मध्ये आयटी उद्योजकांना निमंत्रित करण्यासाठी आणखी एक अंतिम संधी दिली जाणार आहे, त्यानंतर या इमारतीच्या वापराचे प्रयोजन बदलून तेथील गाळे इतर उद्योजकांना देण्याच्या प्रस्तावावर औद्योगिक विकास महामंडळ विचार करणार आहे. महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी (आयटी) विजय सूर्यवंशी यांनी तसे आश्वासन येथील उद्योजकांना आज दिले.
एमआयडीसीत सन २००१ मध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्चून २ हजार २८६ चौरस मिटरचे तीन मजली, ४४ गाळ्यांचे आयटी पार्क उभारण्यात आले आहे. परंतु सर्व सुविधा असूनही, आयटी पार्क उभारल्यापासून रिकामेच आहे. आयटी क्षेत्रातील एकही उद्योजक तिकडे फिरकला नाही. काही वर्षांपूर्वी बंगळुरूस्थित एका आयटी कंपनीने ही इमारत भाडय़ाने घेतली. तरीही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या इमारतीत केवळ आयटी उद्योजकांना परवाना आहे. हे उद्योजक येथे येण्यास तयार नसल्यास इतर क्षेत्रातील उद्योजकांना तेथील गाळे मिळावेत, अशी स्थानिक उद्योजकांच्या संघटनांची मागणी आहे. महामंडळानेही पुढे काही हालचाल केली नाही.
त्यामुळे अखेर महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी महामंडळाच्या आयटी विभागास पत्र पाठवून इमारतीच्या वापराचा उद्देश बदलल्यास व इतर उद्योजकांना गाळे दिल्यास बंद पडलेली वास्तू भरभराटीला येईल, महामंडळालाही उत्पन्न मिळेल व स्थानिकांना रोजगारही मिळेल, अशी मागणी काही दिवसांपूर्वी केली. त्यास सह मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी यांनी प्रतिसाद दिला. आयटी पार्कला भेट दिल्यानंतर त्यांनी उद्योजक वधवा, अजित घैसास, अशोक सोनवणे, प्रकाश गांधी, प्रशांत मुनोत, संजय वाळुंज यांच्याशी चर्चा केली. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापक चव्हाण उपस्थित होते.
आयटी उद्योजकांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी आणखी एक संधी दिली जाईल, त्यासाठी महिनाभरात अधिसूचना जारी केली जाईल, त्याला प्रतिसाद न मिळाल्यास इमारतीच्या वापराचा उद्देश बदलण्याचा प्रस्ताव महामंडळापुढे सादर केला जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
‘सुशोभीकरणासाठी प्रस्ताव पाठवा’
औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था व अस्वच्छता याबद्दल सह मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. क्षेत्रातील चौकांचे सुशोभिकरण करण्यासाठी स्थानिक कंपन्या पुढे येत असल्यास तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याची सूचनाही त्यांनी केली.