News Flash

अखेरच्या दिवशी प्रचारफे ऱ्यांचा दणका

दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा.. त्यातून अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका.. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली उमेदवारांची धावपळ.. प्

| October 14, 2014 07:10 am

दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा.. त्यातून अखेरच्या क्षणापर्यंत सुरू असलेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका.. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चाललेली उमेदवारांची धावपळ.. प्रचार फेरीद्वारे शक्ती प्रदर्शन.. ‘रोड शो’द्वारे मतदारसंघ पिंजून काढण्याची धडपड.. वरिष्ठ नेत्यांच्या बैठका..
विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सोमवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात हे चित्र पहावयास मिळाले. सलग पंधरा दिवसांपासून धडाडणाऱ्या जाहीर प्रचाराच्या तोफा सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. तत्पुर्वी, सर्वच उमेदवारांनी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची कोणतीही संधी दवडली नाही. जाहीर प्रचार संपुष्टात आल्यामुळे नेतेमंडळींनी सुटकेचा नि:श्वास सोडला खरा, पण उमेदवारांना छुप्या प्रचारास लगोलग सुरुवात करावी लागली. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्व मार्ग अवलंबिण्यास सुरुवात झाली असून दुसरीकडे मतदानाच्या दिवशी बुथनिहाय यंत्रणेच्या तयारीवर सर्वानी लक्ष केंद्रीत केले आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३५ विधानसभा मतदारसंघात बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिकचा विचार करता १५ जागांसाठी एकूण १७१ उमेदवार रिंगणात आहेत. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात उमेदवारांची संख्या अशीच आहे. प्रत्येक पक्ष स्व बळावर रिंगणात उतरल्यामुळे तसेच या स्थितीत नाराजांची संख्या मोठी राहिल्याने प्रचाराच्या रणधुमाळी वातावरण अक्षरश: ढवळून निघाले. एकाच टप्प्यात राज्यातील सर्व मतदारसंघात मतदान होत असल्याने यंदा प्रचारास फारसा कालावधी मिळाला नाही. ‘ऑक्टोबर हिट’ आणि अधुनमधून आलेल्या परतीच्या पावसाने उकाडा वाढविला, तशी राजकीय पक्ष व नेत्यांची चिंता वाढविण्याचे काम केले. पावसामुळे भाजपला पंतप्रधानांची सभा पुढे ढकलावी लागली तर कधी हेलिकॉप्टरमधील तांत्रिक दोषामुळे एखाद्या नेत्याला भ्रमणध्वनीवरून भाषण करावे लागले. सर्वच नेत्यांनी जाहीर सभांचा धडाका लावत वातावरण आपल्या पक्षास अनुकूल करण्याची धडपड केली. उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बसपा अध्यक्षा मायावती आदींच्या सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने प्रचार वेगळ्याच टप्प्यावर जाऊन पोहोचला.
जाहीर सभांच्या माध्यमातून सर्वत्र शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नेत्यांच्या सोबतीने उमेदवारांनी चौक सभा, गाठीभेटी, छोटय़ा पडद्यावर नेत्यांच्या भाषणांचे सादरीकरण, प्रचारपत्रकांचे वितरण याद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले. जाहीर प्रचाराची मुदत संपुष्टात येण्याच्या दिवसापर्यंत सर्वानी येनकेनप्रकारे मतदारसंघ ढवळून काढण्याचा प्रयत्न केला.
नाशिक शहरातील सर्व मतदार संघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी भव्य प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांना शह देण्यासाठी प्रत्येकाने फेरीत अधिकाधिक गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वाना कार्यकर्ते व महिलांना जमविण्यासाठी मोठा निधी खर्च करावा लागला. एकाच दिवशी प्रचंड मागणी आल्यामुळे कार्यकर्त्यांचा भाव चांगलाच वधारला होता. काही उमेदवारांनी दुचाकी व चारचाकी वाहनांची फेरी काढून मतदारांना अभिवादन केले. ध्वनीक्षेपकाद्वारे चाललेल्या प्रचाराचा आवाज अखेरच्या दिवशी शिगेला पोहोचला. अगदी काना कोपऱ्यात प्रचारार्थ या वाहनांचा गलका झाला. सायंकाळी प्रचाराची मुदत संपुष्टात आल्यावर वातावरण शांत झाले आणि मतदारांची ध्वनीक्षेपकाद्वारे चाललेल्या माऱ्यातून सुटका झाली. काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्याचे टाळून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. त्यासाठी अधिकाधिक मतदार कुठे सापडू शकतील अशी ठिकाणे धुंडाळून तिथे हजेरी लावली.
जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन फडणवीस यांची नाशिकच्या देवळा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जळगाव व मुक्ताईनगर येथे सभांचे आयोजन करण्यात आले. जाहीर सभांच्या माध्यमातून या दिवशी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला गेला. भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन व हैदर आजम यांनी नाशिक येथे महिला मेळाव्यास उपस्थिती लावली. सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुपा प्रचार व पुढील नियोजनाकडे सर्वानी लक्ष केंद्रीत केले.
लघूसंदेश, समाज माध्यमे, दुरध्वनी व भ्रमणध्वनीवर संपर्क साधून मतदारांना साकडे घालण्यास सुरुवात झाली आहे. मतदानाच्या आधीचे हे दोन दिवस सवार्थाने महत्वाचे असतात. विरोधकांकडून मतदारांना प्रलोभन दाखविले जाते काय. यावर नजर ठेवण्याचे काम करावे लागते. आपल्या हक्काचे मतदान करवून घेणे, बुथनिहाय यंत्रणेचे व्यवस्थापन यावर आता सर्वच उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
वाहतूक कोंडी अन् ध्वनीक्षेपकांची डोकेदुखी
प्रचाराच्या तोफा थंडावण्याच्या दिवशी बहुतांश उमेदवारांनी काढलेल्या भव्य प्रचार फेऱ्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळपर्यंत ध्वनीक्षेपकांद्वारे प्रचाराचा तुफान मारा झाल्यामुळे मतदारांच्या डोकेदुखीत अधिकच भर पडली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे पंधरा दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले. जाहीर प्रचाराची मुदत सोमवारी सायंकाळी संपुष्टात आली. तत्पुर्वी, या दिवशी मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करण्याचे नियोजन बहुतेक उमेदवारांनी केले होते. नाशिक मध्य हा शहरातील अंतर्गत भाग समाविष्ट करणारा मतदारसंघ. काँग्रेसच्या उमेदवाराने आदल्या दिवशी प्रचार फेरी काढली होती. मनसेने सोमवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात फेरी काढली. मध्यवस्तीतील या फेरीत शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या. फटाक्यांची आतषबाजी करत मध्यवस्तीतून ही फेरी मार्गस्थ झाली. परिणामी, महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा, शालिमार, सीबीएस, गंगापूर रोड या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतुकीचे मार्ग बदलवून ती मार्गस्थ करण्याचे प्रयत्न झाले. पण, अंतर्गत रस्ते रुंद असल्याने वाहनधारकांच्या चढाओढीत कोंडी झाली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय, न्यायालय यामुळे मध्यवर्ती भागात सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत नागरीक, विद्यार्थी व वाहनधारकांची एकच वर्दळ असते. नेमक्या याच वेळी फेरी निघाल्याने सर्वाना त्याचा फटका बसला. सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, देवळालीसह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी उमेदवारांनी फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. नाशिकरोड येथील प्रचारफेऱ्यामुळे नाशिक-पुणे महामार्गावरील वाहनधारकांना तिष्ठत रहावे लागले. या शक्ती प्रदर्शनात नाहक वाहनधारक व नागरीक भरडले गेले. प्रचारात मतदारांची आणखी एक डोकेदुखी ठरली, ती ध्वनीक्षेपकाद्वारे झालेल्या प्रचाराची. अखेरच्या दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराची वाहने मतदारसंघातील काना कोपऱ्यात प्रचार करत असल्याने एकच गलका झाला. यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपुष्टात आल्यावर गेल्या काही दिवसांपासून टिपेला पोहोचलेले हे वातावरण शांत झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 7:10 am

Web Title: last day of road show and campaigning
टॅग : Election,Nashik
Next Stories
1 कळवणमध्ये राष्ट्रवादीपुढे भाजप, माकपचे आव्हान
2 गर्दी जमविण्याच्या स्पर्धेमध्ये कार्यकर्त्यांना कमालीचा ‘भाव’
3 एकत्र न राहणारे भाऊ जनतेला कसे न्याय देतील?
Just Now!
X