उत्तराखंडमधील गौरीकुंडजवळ हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील शहीद जवान गणेश अहिरराव यांच्या पार्थिवावर बुधवारी चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथे शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जलप्रलयात अडकलेल्या पर्यटकांच्या मदत कार्यात गुंतलेल्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेनंतर काही जवानांच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने डीएनए चाचणी करावी लागली. त्यात अहिरराव यांच्या पार्थिवाचा समावेश होता. डीएनए चाचणीनंतर त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी मंगळवारी सायंकाळी एअर इंडियाच्या विमानाने औरंगाबाद येथे आणण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान असलेल्या अहिरराव यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव मंगळवारीच वडाळा-वडाळी या त्यांच्या गावी आणण्यात आले होते.  गावातील ग्रामीण रुग्णालयात फुलांनी सजविलेल्या चौथऱ्यावर अहिरराव यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. पालकमंत्री संजय सावकारे व जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.
या वेळी इतर लोकप्रतिनिधींसह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. बुधवारी सकाळी पार्थिवाची अंत्ययात्रा निघाल्यावर ‘शहीद जवान अमर रहे’चा घोष सुरू झाला. ग्रामस्थांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे जड जात होते. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात रचलेल्या चितेवर पार्थिवाला त्यांचा भाऊ गोरख व दीड वर्षांचा मुलगा वंश यांनी भडाग्नी दिला. पोलिसांनी बंदुकीतून फैरी झाडून सलामी दिली. या वेळी जिल्ह्याच्या विविध भागांतून हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.