06 July 2020

News Flash

शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांचा कस

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी होत असतानाच सर्वच उमेदवारांकडून पुढील दोन दिवसांच्या तयारीवर बैठका घेणे सुरू

| April 22, 2014 06:59 am

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचाराची सांगता मंगळवारी होत असतानाच सर्वच उमेदवारांकडून पुढील दोन दिवसांच्या तयारीवर बैठका घेणे सुरू झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा दिवस आणि त्याचा आदला दिवस हे दोन दिवस अधिक महत्वपूर्ण मानले जातात. संपूर्ण निवडणुकीचा निकाल फिरविण्याची क्षमता या दोन दिवसांच्या तयारीवर अवलंबून राहात असल्याने उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या दोन दिवसातच खरी कसोटी लागत असते. त्यामुळेच त्यासंदर्भात बैठकांमध्ये विचारविनिमय होत आहे.
नाशिक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे, मनसेचे डॉ. प्रदिप पवार या तिघांमध्ये मुख्य लढत होत असून तिघा उमेदवारांनी प्रचार यंत्रणा जोरकसपणे हाताळल्याने निकाल वर्तविणे कठीण झाले आहे. नाशिकप्रमाणेच दिंडोरी मतदारसंघातही स्थिती आहे.
आघाडीच्या डॉ. भारती पवार आणि महायुतीचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्यातील लढत अतिशय उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचली आहे. चव्हाण हे हॅट्रीक पूर्ण करतील काय हा या मतदारसंघात चर्चेचा विषय आहे. मंगळवारी जाहीर प्रचाराची सांगता होत असल्याने सर्वच प्रमुख उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांव्दारे शक्ति प्रदर्शनाची तयारी करतानाच त्यानंतरच्या नियोजनाकडे आतापासूनच लक्ष वळविले आहे.
पुणे येथे मतदानाच्या दिवशी हजारो मतदारांना आपली नावेच मतदार यादीत नसल्याचे आढळून आल्याने धक्का बसला होता. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावता न आलेल्या या नागरिकांनी आता आपल्या हक्कासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेण्याचे ठरविले आहे. पुण्यासारखी स्थिती नाशिक व दिंडोरीत उद्भवू नये यासाठी सर्वच पक्षांच्या वतीने मतदार संपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारच्या प्रचार फेऱ्या झाल्यानंतर याप्रश्नी सर्वच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते अधिक प्रमाणात लक्ष देऊ शकतील. आपल्या भागातील मतदारांची नावे यादीत आहेत किंवा नाही ते पाहण्यासाठी राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांमार्फत यंत्रणा उभी करण्याचे ठरविले आहे.
मतदानाचा आदला दिवस आणि रात्र ही वैऱ्याची समजली जाते. मतदारांनी आपल्यालाच मत द्यावे यासाठी काही उमेदवारांकडून मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविण्यात येत असते. प्रतिस्पध्र्याकडून होणारे हे प्रकार रोखण्यासाठी काय काय करता येणे शक्य आहे. त्यावर प्रत्येक उमेदवाराच्या समर्थकांच्या बैठकांमध्ये रणनीती आखण्यात येत आहे. विशेषत: झोपडपट्टय़ांमध्ये असे प्रकार घडू नयेत यासाठी त्या त्या ठिकाणी आपल्या खास कार्यकर्त्यांना देखरेख करण्यासाठी नेमण्याची योजना आखण्यात येत आहे.
मतदारांना धमकाविण्याचे प्रकारही घडू शकत असल्याने अशा प्रवृत्तींना तोंड देण्यासाठी तसेच पोलिसांना त्यासंदर्भात माहिती देण्याची जबाबदारीही काही कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणण्यासाठी काय करता येईल, शहरातील संवेदनशील केंद्रावरील हालचालींवर कसे लक्षात ठेवण्यात येईल, ग्रामीण दुर्गम भागातील केंद्रावर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोणते उपाय योजावेत, कोणत्या केंद्रावर किती मतदान होत आहे याची माहिती उमेदवार आणि मुख्य कार्यालयापर्यंत त्वरीत पोहोचविणे, अशा सर्वच विषयांवर चर्चा करण्यासाठी राजकीय पक्षांच्या बैठका होत असून शेवटच्या दोन दिवसांतील जबाबदारी विश्वासू कार्यकर्त्यांनाच देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2014 6:59 am

Web Title: last two days remain for election
Next Stories
1 अपक्ष उमेदवारांची अनोखी प्रचार शैली
2 बौध्द धर्माचा पाया वैज्ञानिक तत्वांवर आधारीत- गौतम गायकवाड
3 नार-पार पाणीवाटपाचा करार तर काँग्रेसचा
Just Now!
X