ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार लतादीदींच्या वाढदिवशी २८ सप्टेंबर रोजी रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सांयकाळी ६.३० वाजता होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जवळपास ११५ हून अधिक मराठी चित्रपट, २५० हून अधिक नाटके आणि अनेक मालिकांची शीर्षकगीते, तब्बल ५ हजार जाहिरातींसाठी दिलेले संगीत, भावगीते अशा संगीताच्या सगळ्या प्रांतात अशोक पत्की यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. भावसंगीतातील अभिजातता त्यांनी जपली आणि जोपासली आहे. ‘आभाळमाया’, ‘गोटय़ा’, ‘वादळवाट’, ‘मानसी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ यांसारख्या अनेक मालिका त्यांनी शीर्षकगीतांना लावलेल्या चालींमुळेही गाजल्या आहेत. लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केल्यानंतर उत्सवमूर्ती अशोक पत्की यांची प्रकट मुलाखत उत्तरा मोने घेणार आहेत. त्याचबरोबर आरती अंकलीकर-टिकेकर, नीलेश मोहरीर, मंगेश बोरगावकर, मंदार आपटे, आदी गायक-गायिका-संगीतकार कलावंत गाणी सादर करतील.  अभिनेता प्रशांत दामले, गायक स्वप्नील बांदोडकर हेही अशोक पत्की यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये सहभागी होतील.  सोहळ्याचे अध्यक्षस्थान उपमुख्यमंत्री अजित पवार भूषविणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे उपस्थित राहणार आहेत.