गेल्या काही वर्षांपासून गाणे कमी केलेल्या लतादीदींचा सुरेल आवाज  ‘एल. एम. म्युझिक’ या कंपनीतर्फे येणाऱ्या  ‘क्षण अमृताचा’! या अल्बममध्ये ऐकायला मिळणार आहे. या अल्बममध्ये भावगीतांचा समावेश असून त्याचे संगीत दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांनी केले आहे. हा अल्बम येत्या महिन्याअखेपर्यंत प्रकाशित होणार असून स्वत: लतादीदी त्याच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
 ‘क्षण अमृताचा’ या अल्बममध्ये मी उच्च साहित्यिक मूल्ये असलेल्या कविता किंवा गाणी निवडली आहेत. त्यात बा. भ. बोरकर यांच्या चार कविता, आरती प्रभू यांची एक कविता आणि एक संदीपची कविता अशा सहा गाण्यांचा समावेश आहे. त्यापैकी बोरकर यांची दोन गाणी लतादीदींनी गायली असून अन्य गाणी मीच स्वत: गायली असल्याचे सलील कुलकर्णी यांनी सांगितले.
लतादीदींनी या अल्बममध्ये ‘संधीप्रकाशात’ ही बोरकरांची अवीट गोडीची कविता गायली आहे.  त्याशिवाय बोरकरांची ‘आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी’ ही कविताही त्यांच्याच आवाजात गाऊन घेतली आहे.