महापालिकेच्या गेल्या वर्षभरातील कारभारामुळे लातूरची सातत्याने मानहानी होत असून राज्यभरात लातूरची नाचक्की होत आहे. ती थांबविण्याचे आवाहन माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी म्हटले आहे.
कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी िशदे यांना निवेदन दिले. सूर्यकांत शेळके, निळकंठ पवार, जमील मित्री, शब्बीर शेख आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. शहरातील कचरा, पाणी, रस्ते हे प्रश्न कायम आहेत. कोटय़वधीचा निधी येऊनही त्याचा विनियोग व्यवस्थित होत नाही. पालिकेच्या प्रत्येक बठकीत सातत्याने गोंधळ होतो. पक्षाच्या धोरणाविरोधात एखाद्याने मत मांडल्यास त्या सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार महापौरांना आहे. मात्र, अधिकाराचा वापर होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका योग्य पद्धतीने कामकाज करेल, याकडे लक्ष द्यावे. लातूरकरांच्या प्रश्नांबाबत अस्वस्थ झाल्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे कव्हेकर यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
लातूर बाजार समिती व नगरपालिका एकेकाळी आíथकदृष्टय़ा सक्षम होती. लातूरची डालडा फॅक्टरी, सूतगिरणी व दयानंद महाविद्यालय उभारण्यात या संस्थांचा वाटा आहे. असा मोठा वारसा असलेल्या पालिकेची अवस्था इतकी वाईट का झाली? शिवराज पाटील चाकूरकर, जनार्दन वाघमारे अशा मान्यवरांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले व चांगले काम केले. लातूरच्या या प्रश्नांसंबंधी स्थानिक आमदारांशी आपण वेळोवेळी बोललो. पक्षपातळीवरील बठकीत आपल्याला बोलविले जाते, त्यावेळी आपण आपली भूमिका मांडली आहे. सातत्याने भूमिका मांडूनही काहीच फरक पडत नसल्यामुळे लातूरकरांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे म्हणाले की, कव्हेकर पक्षाचे नेते आहेत. मनपातील प्रश्न समजून घेऊन त्यांच्यासमोर भूमिका मांडली असती तर बरे झाले असते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी काय साध्य केले, हे कळत नाही. आपले त्यांच्याशी यावर बोलणे झाले नाही. कोणत्याही पक्षात या पद्धतीने कामकाज चालत नाही. पक्षशिस्त, मर्यादा पाळली तरच पक्षाची विश्वासार्हता टिकून राहते, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कव्हेकर हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, भाजपा अशा सर्व पक्षांत फिरून नव्याने काँग्रेसमध्ये दाखल झाले. कव्हेकरांची चारधाम यात्रा आता पूर्ण झाली आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना जे हवे, ते मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. घाई करून काही पदरात पडत नाही, हे घाई करणाऱ्या नेत्यांनी अनुभवले आहे. कव्हेकरांनी अधिक घाई केली तर त्यांच्या हाती दुसरे काही राहणार नाही, अशा प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.