लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत अजून काहीही ठरले नसल्याचे केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी सांगितले. लातूर येथे ते एका व्याख्यानासाठी आले होते. ‘लातूर लोकसभेवर डॉ. नरेंद्र जाधवांचा डोळा’ या शीर्षकाखाली  ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तांत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शनिवारच्या बातमीमुळे शहरात खळबळ उडाली. काँग्रेसच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.
डॉ. नरेंद्र जाधव शनिवारी सकाळी लातूरमध्ये पोहोचले. सायंकाळी चार वाजता विश्रामगृहावर पुरोगामी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येईल व त्यास डॉ. नरेंद्र जाधव मार्गदर्शन करतील, असे वृत्त स्थानिक वृत्तपत्रात देण्यात आले होते. मात्र, मेळाव्यासाठी पुरेसे कार्यकर्र्ते न जमल्यामुळे मेळावा ऐनवेळी रद्द करण्यात आला. दहा-पंधरा स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. जाधव यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. प्रदीप राठी यांनी बुद्धविहारात ठेवलेल्या कार्यक्रमास डॉ. जाधव यांनी हजेरी लावली. गेल्या पाच वर्षांपासून राठी हे आपल्याला कार्यक्रमास बोलावत होते. त्यामुळे मी तिकडे जाणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. शासकीय विश्रामगृहावर प्रस्तुत वार्ताहराने त्यांना लोकसभेच्या निवडणुकीस ते उमेदवाराच्या स्पर्धेत आहेत का, यासंबंधी छेडले असता, अद्याप काही ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले असले तरी आपण स्पर्धेत नसल्याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही.