शहरातील कचरा डेपोच्या प्रश्नाने नव्याने डोके वर काढले असून, वरवंटी ग्रामस्थांनी कचरा डेपोवरील कचरा टाकण्याच्या गाडय़ा परत पाठवण्याचे आंदोलन रविवारी सुरू केले. त्यामुळे कचरा डेपोवरून पुन्हा वादंग पेटण्याची शक्यता वर्तविली जाते.
वरवंटी येथील कचरा डेपोमुळे नांदगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल आंदोलन पुकारले. तीन महिने शेतकऱ्यांनी कचरा डेपोवर कचरा टाकू दिला नाही. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पुणे येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कचऱ्याचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवला जाईल. नागरिकांचा त्रास कमी केला जाईल, असे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण झाले नसल्याचे कारण देत रविवारी ग्रामस्थांनी अचानक आंदोलन पुकारले. नांदगाव, बसवंतपूर, वरवंटी येथील शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कचऱ्यामुळे माश्यांचा व अन्य त्रास होऊ नये, यासाठी जुना कचरा हटविण्यासाठी मोठे यंत्र कार्यरत आहे. नव्याने टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला व सुका कचरा कचरा डेपोवर पाठवला जात आहे. शहरातील सुमारे सहाशे पोती प्लॅस्टिक पिशव्या एकत्रित केल्या असून, औरंगाबाद येथे पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.
नागरिकांचा त्रास कमी व्हावा, यासाठी प्रशासन अधिक गंभीर असून त्यादृष्टीनेच पावले उचलली जात आहेत. ग्रामस्थांनी इतके दिवस त्रास सहन केला. सतत आठ दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे कामाचा उरक होण्यात अडचण येत असल्याचे आयुक्त तेलंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. वरवंटी, नांदगाव व बसवंतपूर परिसरातील जनता मात्र महापालिकेवर विश्वास ठेवायला तयार नाही. या पाश्र्वभूमीवर कचरा डेपोवरून पुन्हा वादंग पेटण्याची शक्यता आहे.