दक्षिण कोरियातील सेऊल येथे १९ ते २३ जून या कालावधीत आयोजित ‘विश्व श्री’ या जागतिक अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या वतीने निवडण्यात आलेल्या संघात नाशिकच्या भगवान सोनवणे यांचा समावेश झाल्याबद्दल विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक जिल्ह्य़ाच्या इतिहासात आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होणारे सोनवणे हे पहिले खेळाडू आहेत. याआधी १९८६ मध्ये ब्राझील येथील जागतिक स्पर्धेकरिता नाशिकच्या सॅमसन जोसेफची भारतीय संघात निवड झाली होती. परंतु काही कारणास्तव त्याला त्या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते.
सोनवणे हे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून सध्या मालेगाव येथे वाहतूक हवालदार आहेत. सोनवणे यांच्या सत्काराप्रसंगी प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच दीपक बागूल उपस्थित होते.