‘वरून कीर्तन आतून तमाशा’ या उक्तीचा अनुभव जिल्ह्यातील चोपडा येथे आला आहे. येथे सोमवारी रात्री आयोजित भजन संध्या कार्यक्रमात भजन सोडून चक्क लावणीचे प्रदर्शन झाले. विशेष म्हणजे आयोजकांपैकीच काही जणांनी गायिकेवर एखाद्या डान्स बारमध्ये नर्तिकेवर नोटा उधळाव्यात त्याप्रमाणे नोटा उधळल्या. या प्रकाराविरूध्द आंदोलन करण्याचा इशारा तालुक्यातील काही संघटनांनी दिला आहे.

चोपडय़ात २८ जानेवारीपर्यंत एका विशाल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जानेवारीपासून हा कार्यक्रम सुरू आहे. यानिमित्त कृषी प्रदर्शन तसेच जत्रेचे आयोजन केले गेले. आयोजनात इतर समाजाकडून पाच ट्रक केळी दान देण्यात आली आहेत. परंतु आयोजन समितीचे अध्यक्ष मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कृषी प्रदर्शन समितीच्या एका सदस्याने आमचा वापर फक्त कृषी प्रदर्शनात कंपन्यांना बोलवण्यापुरता करून घेण्यात आल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यांना वाहन उभे करण्यासही पैसे मोजावे लागत आहेत.
या कार्यक्रमात साधूसंतांसह शेकडो कार्यकर्ते, स्वयंसेवकांसाठी रोज भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी साखर आणि तांदूळ कोठून आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व गोंधळाने सोमवारी रात्री आयोजित भजन संध्या कार्यक्रमात गळस गाठला गेला.
या भजन संध्येसाठी इंदूर येथील गायिका सोना जाधव आली होती. आयोजक समितीचे अध्यक्ष आणि समितीतील एक वरिष्ठ सदस्य कार्यक्रम सुरू असताना थेट मंचावर चढून नाचू लागले.या गायिकेनेही भजन सोडून सरळ लावणी गाण्यास सुरूवात केली. आयोजन समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या चेल्यांनी गायिकेवर डान्सबारमध्ये लुटवतात त्याप्रमाणे १००, ५००, १००० रूपयांच्या नोटांची उधळण करण्यास सुरूवात केली.
गायिकेने भान विसरून ‘मला जाऊ द्या ना घरी, आता वाजलेकी बार’ सुरू केले. हे सर्व होत असताना अध्यक्षांच्या मालकीच्या केबल नेटवर्कवरून हा सर्व किळसवाणा प्रकार चोपडा शहरासह तालुक्यातील ४० खेडय़ांमधील नागरीक पाहात होते. या घटनेचे शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटत असून बालयोगीजी महाराज यांनी तीव्र शब्दात या प्रकाराचा निषेध केला आहे. या घटनेची तालुक्यात अनेक जणांनी िनदा केली आहे.