वृद्धाश्रमाची कल्पना आपल्याला मान्य नसून आई-वडिलांची सेवा, त्यांचा सांभाळ करणे यासाठी सरकारला कायदा करावा लागला हे दुर्दैवी आहे. म्हणूनच बालकांना आधात्मिक सुसंस्काराची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. बामणे कुटुंबीयांतर्फे गजाननमहाराज येथे आयोजित केलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ाप्रसंगी बोलत होते.    
पारायण सोहळय़ानंतर आनंदमहाराज सांगवडेकर यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरमूर्तीचे पूजन व पालखी काढण्यात आली. या वेळी संतश्रेष्ठ नामदेवमहाराज यांचे १७ वे वंशज ह.भ.प.मुरारीमहाराज नामदास (पंढरपूर) यांचे प्रवचन झाले. प्रवचनात वैष्णवांच्या घरचे आचरण विशद करताना अंगण, तुळस, देवघर आणि पाहुण्यांचे स्वागत व पाहुणचार यावरून घरातील माणसांची ओळख होते असे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळय़ास भोगावती कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील (कौलवकर), नगरसेवक राजू पसारे, माजी महापौर शिवाजीराव कदम, दत्तात्रय इंगवले, दत्त देवस्थान शिर्के मठाचे महेश शिर्के, टेंबलाई देवस्थानचे किसन गुरव, श्रीपूजक नितीन मुनिश्वर आदी उपस्थित होते. स्वागत ज्ञानेश्वर सुतार यांनी केले. आभार दादा खोत तर सूत्रसंचालन मोहनराव खाडे यांनी केले.