औषध क्षेत्रात काही समाजकंटकांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे नक्कल केलेली औषधे बाजारात विक्रीसाठी येतात. या औषधांमुळे रुग्णांना गुण येण्याऐवजी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. हे टाळण्यासाठी औषध विक्रेत्यांनी जागरूक असले पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त एस. टी. पाटील यांनी येथे केले.
या वेळी कुंदनानी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. सी. व्ही. आच्छरा, ‘आयपीए’च्या उपाध्यक्ष प्रा. मंजिरी घरत, अन्न व औषध प्रशासनाचे प्रकाश महानवर, कल्याण, उल्हानगर औषध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बनावट औषधांचा वापर रोखणे आणि ग्राहकांना दर्जेदार औषधांचा पुरवठा करणे याविषयी जागृती करण्याचा कार्यक्रम उल्हासनगरमधील कुंदनानी फार्मसी तंत्रनिकेतन आणि भारतीय औषध विक्रेता संघटनेतर्फे आयोजित केला होता. या वेळी शहर परिसरातील औषध व घाऊक विक्रेते उपस्थित होते. कामाच्या ठिकाणी योग्य पद्धतीचा अवलंब केला तर बनावट औषधांचा शिरकाव होणार नाही.  किरकोळ विक्रेत्याने औषध खरेदीची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी आणि विहित चौकटीचा औषध खरेदी, विक्रीसाठी अवलंब करावा, असे पाटील यांनी सांगितले.
बनावट औषधे कशी ओळखायची, मूळ औषधाची नक्कल होऊ नये म्हणून मूळ उत्पादक करीत असलेले प्रयत्न, किरकोळ विक्रेत्यांचे ग्राहकांशी संबंध या विषयावर औषध प्रशासनाचे माजी उपायुक्त राम बनारसे यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ औषध विक्रेते फ्लमर्झ फर्नाडी यांनी औषध विक्रेत्यांनी आपला व्यवसाय चोख होण्यासाठी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. औषध विक्रेते व ग्राहकांच्या जागृतीसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अन्य ठिकाणी घेण्यात येणार आहेत, असे प्रा. घरत यांनी सांगितले.