लक्ष्मण ढोबळे निमंत्रण प्रकरण
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवं. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर बलात्कारासारखे गंभीर आरोपाचे धनी असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्थान देण्यात आल्याने कार्यक्रमाला नक्कीच ग्रहण लागले आहे. मात्र, गोळी बंदुकीतून सुटल्यानंतर काहीच करता येत नाही, अशीच अवस्था या कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची झाली आहे.
दिवं. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्राच्यावतीने व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमात एकीकडे व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त पोलिस आयुक्त धनराज वंजारी यांना तर दुसरीकडे अध्यक्षस्थानी बलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. ढोबळेंच्या बौद्धिक आणि वक्तृत्त्व क्षमतेबद्दल यत्किंचितही शंका नाही, पण बलात्काराच्या आरोपातून त्यांना ‘क्लिनचिट’ मिळालेली नाही. अटकपूर्व जामिनावरच ते बाहेर आहेत. अशा परिस्थितीत दिवं. यशवंतरावांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरणार आहे.
यासंदर्भात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांपैकी काहींनी चूक मान्य करण्याचे धाडस दाखवले, तर काहींनी कानावर हात ठेवत ‘अळीमिळी गुपचिळी’ अशी भूमिका घेतली. यासंदर्भात प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पदाधिकारी गिरीश गांधी यांनी, तात्विकदृष्टय़ा चूक झाल्याचे मान्य केले. निमंत्रण देताना हे लक्षातच आले नाही. मी त्यांना स्वत: आमंत्रण दिल्याने आता ते टाळता येणे अशक्य आहे, असे ते म्हणाले. प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनीही चूक झाल्याचे मान्य करून हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवे होते. ढोबळेंना टाळता आले असते. कार्यक्रम ठरविताना मला माहिती नव्हते, असे ते म्हणाले. ढोबळेंवरील बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण माहिती होते, पण कार्यक्रमातील पाहुण्यांना बोलाविण्याचा निर्णय ज्येष्ठ घेतात. प्रतिष्ठानमध्ये फारसे जाणे होत नाही, त्यामुळे ज्येष्ठांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तरीही उद्या, गुरुवारला गिरीश गांधींसोबत असलेल्या बैठकीत हा विषय त्यांच्यासमोर मांडण्यात येईल, असे माधवी पांडे म्हणाल्या. ढोबळेंना बोलाविण्यात चूक झाली हे त्यांनीही मान्य केले. रमेश बोरकुटे यांनी मात्र कानावर हात ठेवले. तुम्ही आधी गिरीश भाऊंशी बोला. मी या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही आणि मला ते उचितही वाटत नाही, असे रमेश बोरकुटे म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न केल्यानंतर अनेकांनी त्यांचे भ्रमणध्वनी बंद केलेले होते. डॉ. अक्षयकुमार काळे, किशोर कन्हेरे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. मोईझ हक आदींचा यात समावेश होता.