महापालिकांवर लादलेल्या एलबीटी प्रणालीच्या विरोधात पुकारलेले आंदोलन तूर्त मागे घेत नागपुरातील व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास सुरूवात केली असून पाच दिवसात ३ कोटी १० लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेला यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
एलबीटीला विरोध करण्यासाठी  नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि एलबीटी विरोधी संघर्ष समितीने जवळपास दीड महिना आंदोलन केले होते. या काळात व्यापाऱ्यांनी नोंदणी करायची नाही आणि एलबीटी कर भरायचा नाही, असा निर्णय घेतला होता. जकातीच्या माध्यमातून येणारा महसूल बंद झाल्याने महापालिकेवर आर्थिक संकट ओढ़वले होते.  कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी दंड वसुलीवर भर देण्यात आला होता.
महापालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच दिवसात तिजोरीत ३ कोटी रुपये ३ कोटी १० लाख रुपये जमा झाले आहेत. यापैकी सर्वाधिक वसुली रहदारी पासमधून झाली असून ७० लाख रुपये मिळाले आहे. आतापर्यंत २५ हजार ५०० व्यापारांनी नोंदणी केली असल्याची माहिती एलबीटी विभाग प्रमुख महेश धामेचा यांनी दिली. बुधवारी ३०० व्यापाऱ्यांनी तर गुरुवारी ४५९ व्यापारांनी नोंदणी अर्ज नेले आहे. मे महिन्यात एलबीटीतून १६ कोटी जमा झाल्याचे धामेचा यांनी सांगितले.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एलबीटीसंदर्भातील काही नियम शिथील केल्यामुळे व्यापारांनी एलबीटी भरण्यास प्रारंभ केला असला तरी आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे. जो पर्यंत सरकारकडून एलबीटी नवीन अध्यादेश निघत नाही तो पर्यंत निषेध नोंदवून महापालिकेकडून अर्ज घेतले जातील. नोंदणी मात्र केली जाणार नाही, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले.