महापालिकेचा स्थानिक संस्था कर चुकविण्यासाठी शहराबाहेरील पत्त्यावर माल मागवून, शहरातील गोदामात उतरून घेताना नव्या मोंढय़ातील जैन स्टील यांची लोखंडाची मालमोटार एलबीटी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडली. या बरोबरच नव्या मोंढय़ात जेठवाणी यांच्या साई प्लायवूड या गोदामावरही छापा टाकून पथकाने कारवाई प्रस्तावित केली.
शहरात स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे. स्थानिक संस्था कर हा व्यापाऱ्यांच्या लेख्यावरुन आकारला जातो. मात्र, हा कर चुकविण्यासाठी अनेक व्यापारी नवनवीन युक्त्या आखत आहेत. परभणीत व्यापार करून त्यांची गोदामे मात्र शहराबाहेर आहेत. त्या ठिकाणची नोंदणी त्यांनी केली आहे. शहराबाहेरच्या पत्त्यावर माल मागवून माल तेथे न उतरवता शहरातील गोदामात उतरवून घेतला जातो. व्यापाऱ्यांच्या या चलाखीमुळे महापालिकेचे स्थानिक संस्था कराचे उत्पन्न मात्र बुडते.
बुधवारी दुपारी नवा मोंढय़ात जैन स्टील या दुकानात मालमोटारीतून लोखंड उतरवताना स्थानिक संस्था कर वसुली पथकातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता मालमोटारीच्या चालकाकडे असलेल्या बिलावर कारेगावचा पत्ता होता. कारेगावचा माल असताना शहरात उतरविला जात असल्यामुळे महापालिकेने ही मालमोटार (एमएच २२ एन २५८६) जप्त केली. जैन स्टील या दुकानाचे लेखे ताब्यात घेण्याची कारवाई मनपाकडून करण्यात येत आहे.
शहरात नोंदणी न झालेली अनेक व्यापाऱ्यांची गोदामे आहेत. पकी जेठवाणी यांचे साई प्लायवूड या दुकानाचेही गोदाम नवा मोंढय़ात आहे. एलबीटीच्या कर्मचाऱ्यांनी या गोदामावर छापा टाकून गोदामातील मालाचा पंचनामा केला. त्यानंतर दुकानदाराने मनपाकडे नोंदणी करण्याबाबत होकार दिला, तरीही साई प्लायवूडवर कारवाई प्रस्तावित केली जाईल, अशी माहिती उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली. यापुढे व्यापाऱ्यांचे लेखे तपासले जातील, असे त्यांनी सांगितले.