खासगी प्राथमिक शाळांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी नागपूर येथे झालेल्या बैठकीत दिले असल्याचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले.     
खासगी प्राथमिक शाळांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात जानेवारी २०१३ मध्ये संघटनेची बैठक बोलावून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शालेय मंत्री दर्डा यांनी दिले. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षकसेवक समितीचे धरणे आंदोलन नागपूरच्या पटवर्धन मैदानात झाले. या वेळी शिक्षण मंत्र्यांनी संघटनेला चर्चेसाठी विधान भवनात बोलाविले होते. राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाने दर्डा यांच्याशी चर्चा केली.
या वेळी प्रलंबित मागण्यांमध्ये खासगी शाळांना शिक्षण हक्क कायदा लागू करणे, मूल्यांकनाच्या जाचक अटी रद्द करणे, विना अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके देणे, गणवेश देणे, २०१३ पासून वेतनेतर अनुदान देणे या मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी नागपूर येथे धरणे आंदोलन केले होते. या वेळी दर्डा म्हणाले, या खात्याच्या अधिकारी व संघटनेची संयुक्त बैठक जानेवारी २०१३ मध्ये घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
 या शिष्टमंडळात जयवंत हक्के (सोलापूर), राजेंद्र वाणी (औरंगाबाद), अंजन पाटील (धुळे), सारंग पाटील (पुणे) जी.डी.मोराळे आदी उपस्थित होते.