महिला सक्षमीकरणाचा जप करणाऱ्या नेत्यांना महिलांच्या उपक्रमांसाठी मात्र पुरेसा वेळ मिळत नाही. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित केलेल्या ताराराणी महोत्सवाच्यावेळी आला. या कार्यक्रमाकडे सहकार तथा पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ या मंत्र्यांनी तसेच खासदार सदाशिवराव मंडलिक, खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्ह्य़ातील बहुतांशी आमदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. जिल्ह्य़ातच असणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीने महोत्सवाची थोडीतरी लाज राखली गेली.     
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनत्ती अभियान योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ातील स्वयंसहायता बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन येथे आजपासून करण्यात आले आहे. केशवराव भोसले नाटय़गृहासमोरील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर हा महोत्सव ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. हा उपक्रम ताराराणी महोत्सव या नावाने राबविला जातो. निमंत्रित मंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने जिल्ह्य़ातच असणारे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी महापौर जयश्री सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव चौगुले, प्रकल्प संचालक टी.बी.पाटील उपस्थित होते.    
महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मालांना सातत्याने बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व अन्य विभागांनी बचतगटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करून सतेज पाटील म्हणाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात एक विक्री केंद्र कायमस्वरूपी सुरू करण्यात येत आहे. जूनपर्यंत सात विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. गृहराज्यमंत्री पाटील, म्हैसेकर, महापौर सोनवणे यांनी बचतगटांच्या स्टॉल्सना भेटी देऊन उत्पादनांची पाहणी केली.