कामगारांचा सुरू असलेला संप मोडून निघावा अशी भूमिका कामगार नेतेच घेत आहेत. यंत्रमाग कामगारांचा संप मिटावा, यासाठी यंत्रमागधारक संघटना सकारात्मक पावले उचलत असताना दररोज वेगवेगळय़ा मागण्या समोर आणून ते कामगारांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी केला.
इचलकरंजी येथील कल्याण केंद्र येथे यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कोष्टी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कोष्टी म्हणाले, आम्ही घेतलेली पाच पैशावरून बारा पैशांची वाढ व १५ टक्के बोनस ही भूमिका कायम असून जर कामगार पुढाऱ्यांना हा व्यवसाय टिकावा असे वाटत असेल तर त्यांनी चर्चेस यावे असे आवाहन केले. त्याचबरोबर कोणीही कारखाना सुरू करू नये आणि कामगारांना उचल देऊ नये.
ज्येष्ठ यंत्रमागधारक तुकाराम पाटील यांनी कामगार पुढाऱ्यांनी हा संप लादला असल्याचे सांगून कामगारांनी पुढाऱ्यांचा नाद सोडावा असे आवाहन केले. सचिन हुक्किरे यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांमध्ये संभ्रमावस्था असून संप लादून वस्त्रनगरीतील उद्योग ठप्प करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप केला. यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी शक्य नाही अशी मागणी करून कामगार नेते कामगारांना भडकवत आहेत. या पुढाऱ्यांची बनवाबनवी आता कामगाराच्याही ध्यानात येत आहे. फिक्स पगार देणार नाही असा निर्धार व्यक्त केला.
या वेळी राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, राजगोंडा पाटील, नारायण दुरुगडे, बंडोपंत लाड, दिनकर अनुसे, बाळकृष्ण लाटणे, अमोल लाटणे, प्रवीण रावळ, अशोक सुतार आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले.