राज्यात संघटनात्मक पातळीवर राहुलबाबांचा चेहरा कार्यकर्त्यांसमोर राहावा, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी युवक काँग्रेस पदाधिका-यांची निवडणूक आवर्जून घेतली जात आहे. जिल्हापातळीवर मात्र या निवडणुकीत नेत्यांनी स्वत:च्या वारसांना पद्धतशीर पुढे करण्याचा उद्योग सुरूच ठेवला आहे. बीड जिल्ह्य़ात खासदार रजनीताई पाटील यांचा मुलगा आदित्य व माजी आमदार  सिराजोद्दीन देशमुख यांचे चिरंजीव ख्वाजा फरिदोद्दीन देशमुख हे दोघेही राज्याच्या कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी नशीब अजमावत आहेत. या दोन प्रमुख नेत्यांसह आपल्याच वारसाला निवडणुकीत यश मिळावे, यासाठी नेत्यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
युवक काँग्रेस कार्यकारिणी पदाधिका-यांची निवड मतदान पद्धतीने करण्यात येते. बीड जिल्हय़ात युवक काँग्रेसची निवडणूक प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उद्या (गुरुवारी) व शुक्रवारी लोकसभा, विधानसभा व प्रदेश कार्यकारिणी कार्यक्षेत्रासाठी मतदान होणार आहे. काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप होतो. नुकत्याच चार राज्यांतील निवडणुकीनंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सर्वत्र दौरा करीत आहेत. संघटनेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांला स्थान मिळावे, असेही ते सांगतात. मात्र, असे असले तरी या प्रक्रियेतूनही देशपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत पुढा-यांच्याच राजकीय वारसदारांचा वरचष्मा दिसू लागला आहे.
मागच्या वेळी लोकसभा स्तरावर काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार सिराजोद्दीन देशमुख, सुभाष सारडा या दिग्गजांची मुले सहभागी झाली होती. या वर्षीच्या निवडणुकीतही दिग्गज नेत्यांची मुले, नातेवाईक व मित्रपरिवार यांचा बोलबाला आहे. अशोक पाटील, काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांचे चिरंजीव आदित्य, तसेच माजी आमदार देशमुख यांचे चिरंजीव ख्वाजा फरिदोद्दीन देशमुख हे दोघेही राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीत नशीब अजमावत आहेत.
बीड विधानसभा कार्यक्षेत्रात १७, केज १४, गेवराई ७, आष्टी ५, माजलगांव ७, परळी ११ असे ६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हय़ात २ हजार ४२० मतदार आहेत. या निवडणुकीत प्रदेश कार्यकारिणीतील दोन उमेदवारांसह विधानसभा कार्यक्षेत्रासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांतही काँग्रेसच्याच नेत्यांची मुले, त्यांचे मित्र व नातेवाईक यांचा समावेश आहे.