News Flash

‘पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक हवा’

शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असताना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक असला पाहिजे.

| January 11, 2014 03:35 am

शहराचा विकास आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असताना पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर वचक असला पाहिजे. शहरात विकास कामे होत असली तरी या कामांमध्ये कुठलीच गती नाही. प्रशासनासोबत केवळ गोड बोलून चालणार नाही. कायदेशीर आणि नियमानुसार कामे प्रशासनाकडून होत नसतील तर त्यांच्या वेतनातून कपात करा, असा सल्ला देत पदाधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी केले.
जेएनएनयूआरएमतंर्गत महापालिकेच्या नंदनवन परिसरातील जलकुंभाचे उद्घाटन नितीन गडकरी आणि पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते करण्यात आले.
महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर जैतुनबी अंसारी, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, नीता ठाकरे, बंडू राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शहरात विविध कामे सुरू असताना कामाची गती मात्र थंडावली आहे. गेल्या दोन वर्षांत चांगले उपक्रम राबविले आहे. त्या उपक्रमात सातत्य ठेवत नसल्यामुळे जनतेच्या समस्या कायम आहेत. नागरिकांना चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू केलेली योजना अनेक राज्य अंमलात आणत असताना आता या योजनेकडे महापालिकेने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. २६ पाण्याच्या टाक्या मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी २२ टाक्यांचे काम सुरू करण्यात आहे.
सिमेंट रस्त्याची कामे हाती घेतली आह. ती अर्धवट स्थितीत आहे. विकास कामांना उशीर होत असल्यामुळे त्याचा बोजा हा जनतेवर पडत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेच्या विकासाची कामे झाली पाहिजे. लंडन स्ट्रीटचा साडेचार हजार कोटींचा प्रकल्प आहे. त्यात काही अडचणी असतील त्या प्रशासनाच्या मागे लागून दूर केल्या पाहिजे. रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहाचे काम गेल्या आठ ते नऊ  महिन्यापासून बंद असून ते लवकर सुरू करा, असेही गडकरी म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन सुधाकर कोहळे यांनी केले.
महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी अनेक घोषणा आणि आश्वासने दिली असताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची गरज आहे. शहरात जर विकास कामाची अशीच गती राहिली तर लोक माझ्या घरावर मोर्चा घेऊन येतील आणि मला नाईलाजाने महापौरांच्या घरावर मोर्चा न्यावा लागेल. त्यामुळे अडचणी येत असतील तरी त्या दूर करून नियोजित वेळेत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, असा सल्ला गडकरी यांनी महापौरांसह नगरसेवक आणि प्रशासनाला दिला.
एरवी शहराच्या विकासासंबंधी महापालिकेचा जाहीर कार्यक्रम असला की पालकमंत्री शिवाजीराव मोघे कार्यक्रमाला उपस्थित नसतात. मात्र, शुक्रवारी नंदनवनमधील जलकुंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते आवर्जुन उपस्थित होते. उद्घाटन करून कार्यक्रमात सहभागी न होता ते निघून गेले. मोघे यांची महापालिकेच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती चर्चेचा विषय होती. यापूर्वी त्यांना अनेक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जात असताना ते नागपुरात राहूनही उपस्थित राहत नव्हते आज अचानक ते कसे आणि कुणासाठी आले? अशी चर्चा महापालिका वर्तुळात होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 3:35 am

Web Title: leaders should awe system
Next Stories
1 राहायला घर नाही, खाण्यासाठी अन्न नाही
2 बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाची माहिती प्रत्येकाला हवी – दलाई लामा
3 आग प्रतिबंधासाठी मंत्रालयात अनेक आधुनिक उपाययोजना