माणूस पैशाच्या, सत्तेच्या हव्यासात गुरफटत चालल्याने समाजातील माणूसपण हरवत चालले आहे. तरी समाजाला काहीतरी द्यायला शिका, तरच आपण माणूस म्हणून लायक आहोत, असे मत वसुंधरा प्रकल्पाचे पुणे विभागीय आयुक्त डॉ. इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
काले (ता. कराड) येथील प्रेरणा प्रतिष्ठान व महात्मा गांधी विद्यालय यांच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पहिल्या वसतिगृहास विशेष योगदान देणारे माजी शिक्षक आर. बी. पाटील, यशवंत कुलकर्णी, विनायक कुलकर्णी, यशोदा कुंभार यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. एन. देसाई, अनिल मोरे, एच. एस. भिलारे, मुख्याध्यापक बी. डी. ढोबे, आर. एस. मोहिते, डी. एम. जाधव, जालिंदर पोतदार, विकास पाटील, राजाराम पाटील, संतोष गुरव, संभाजी यादव, सत्यजित कुलकर्णी, जितेंद्र पाटील, सुरेश तेली, माणिक यादव, योगेश खराडे यांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ. इंद्रजित देशमुख म्हणाले, की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला योग्य शिस्त लावणे गरजेचे आहे. देशाच्या महान व्यक्तींच्या अंगी शिस्त होती. त्यांच्या कर्तृत्वावर आज देश उभा आहे. आज समाजात शिस्त राहिलीच नाही. पैसा आणि सत्ता या मागे जो तो धावू लागला आहे. समाजातील माणूसपण हरवत चालले आहे. मात्र, आजच्या या सत्कारमूर्तीनी त्या काळात केलेल्या कार्याकडे पाहिले असता त्यांनी आपल्या कुटुंबाकडे न पाहता कृतज्ञतेच्या भावनेने योगदान दिले आहे. आपणही अशीच प्रेरणा घेऊन कर्मवीरांच्या कार्यास हातभार लावला आहे. स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तरुणांपुढे आदर्श ठेवला आहे. कशाचीही पर्वा न करता देशाच्या उभारणीसाठी त्यांनी महान काम करून ठेवले आहे. त्यांचा आदर्श तरुणांनी अंगी बाळगावा.
आर. बी. पाटील म्हणाले, की मी काले येथे २८ वष्रे सेवा केली. पण या काळात माझ्या हातून असा एकही विद्यार्थी गेला नाही, की त्याला मी शिक्षा केली नाही. त्याच शिक्षेमुळे माझा प्रत्येक विद्यार्थी आज त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उच्चपदावर आहे. मी प्रामाणिक सेवा केल्याने माझे आयुष्य आनंदी आहे. शिक्षकांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील राहावे तीच खरी संपत्ती आहे. प्रास्ताविक के. एन. देसाई यांनी केले.