नाथ सीडस्कडे असणाऱ्या २८ एकर ३४ गुंठे जागेच्या भाडेपटय़ाची रक्कम न भरल्याने वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे एक कोटी ४१ लाख ३५ हजार रुपये थकबाकी असल्याचे नोटीशीत नमूद करण्यात आले आहे. या पूर्वी व्हिडिओकॉन उद्योगसमूहास नोटीस बजावण्यात आली होती. तसेच मौलाना आझाद महाविद्यालयासही कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
 वक्फ मंडळाचे तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी पठाण यांनी जमिनीचे अनेक गरव्यवहार केले. त्याची चौकशी नुकतीच माजी आयुक्त कृष्णा भोगे यांनी केली. जमिनीचे अनेक घोटाळे यात उघडकीस आले. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसेन यांनी भाडेपटय़ातील दोष दूर करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. व्हिडिओकॉन बरोबरच नाथ सीड्सला नोटीस बजावण्यात आली आहे. २००४- ०५ पर्यंत ६९ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी होती. ती रक्कम कंपनीने भरलेली नाही. दरवर्षी ८ लाख ९८ हजार रुपये या कंपनीने भरणे अपेक्षित आहे. मात्र, ही रक्कम न भरल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयासही नोटीस बजावण्यात आली आहे. २०११ मध्ये या अनुषंगाने वक्फ मंडळाने नोटीस बजावूनही महाविद्यालय प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. नव्याने करार न झाल्यास वक्फ ५४ क्रमांकाच्या नियमान्वये कारवाई करू, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.