शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी आलेल्या निधीच्या कामांमधून केवळ राजकीय आकसापोटी केडगावला वगळण्यात आल्याची तक्रार काँग्रेसच्या नगरसेविका सुवर्णा संदीप कोतकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निधीतून केडगाव पाणीयोजनेचे काम करण्यासंबंधीच्या सूचना महानगरपालिकेला देण्याची मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात कोतकर यांनी म्हटले आहे की, केडगाव हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागात पक्षाचे पाच नगरसेवक आहेत. केवळ याच राजकीय आकसातून मनपातील सत्ताधा-यांनी या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या परिसरातील मोठय़ा भागात ६ ते ७ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. इंदिरानगर, शाहूनगर, विद्यानगर, ताराबाग, हनुमाननगर, एकतानगर, शास्त्रीनगर या वसाहतींना नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी मनपा प्रशासनाने ३ कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव केला आहे.
शहरातील मूलभूत कामांसाठी राज्य सरकारने २० कोटी रुपयांचा निधी दिला असून या निधीतून केडगावची योजना होणे गरजेचे आहे. या भागातील सर्व नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतही एकमुखी तशी मागणी केली होती. मात्र केवळ पक्षीय आकसापोटी सत्ताधा-यांनी या योजनेचा यात समावेश करण्याचे टाळले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खास बाब म्हणून शहरासाठी हा निधी देताना कोणताही राजकीय अभिनिवेष ठेवला नाही, मनपात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी शहराला हा निधी दिला, मात्र त्याचा विनियोग स्थानिक पातळीवर राजकीय दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवूनच होत आहे. या कामांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार महसूल विभागाच्या आयुक्त व नगर विकास विभागाकडे आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊनच केडगावच्या योजनेचा या कामांमध्ये समावेश करण्याच्या सूचना या विभागांना द्याव्या अशी मागणी कोतकर यांनी या निवेदनात केली आहे.