येथील ‘द व्हर्सटाइल ग्रुप’च्या वतीने शुक्रवारी (दि. २२) ‘ओळख दुर्बिणीची’ कार्यक्रमाच्या माध्यमातून खगोलप्रेमींसाठी व्याख्यान व आकाशदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जीएमआरटी, खोडद संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक सुधीर फाकटकर यांचे व्याख्यान होणार आहे.
रेडिओ खगोलशास्त्र ही खगोलशास्त्राचीच एक शाखा आहे. ज्यामध्ये अवकाशातून येणाऱ्या विविध तरंगलांबींच्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला जातो. अवकाशातील रेडिओ लहरी दृश्य स्वरूपात नसल्याने त्यांचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर केला जातो. रेडिओ दुर्बिणीच्या माध्यमातून प्रकाशाव्यतिरिक्त असणाऱ्या किरणांच्या माध्यमातून अवकाशीय घटकांचे निरीक्षण केले जाते.
या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील पेमराज सारडा कॉलेजच्या बहुद्देशीय सभागृहात सायंकाळी ६.३० ते रात्री ९ दरम्यान होणार आहे. व्याख्यानानंतर उपस्थितांना दुर्बिणीतून अवकाशदर्शनाचा लाभ घेता येईल, तसेच जीएमआरटी, खोडद येथील रेडिओ दुर्बिणीला भेट देण्यासाठी नावनोंदणी करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी मो. ९८९०६२९८४८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आहे. फाकटकर ‘रेडिओ दुर्बिण-अदृश्य किरणांचा शोध’ या पुस्तकाचे लेखक आहेत.