परिमंडळ १ मधील पोलिसांना यापुढे आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे नव्हे तर सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे जावे लागणार आहे. उपायुक्तांनी असे आदेश देणारे परिपत्रकच काढले आहे. आजारी असल्याचे सांगून परस्पर सुट्टी घेणाऱ्या पोलिसांना लगाम घालण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले आहे. पण त्यामुळे खरेखुरे आजारी असणाऱ्या पोलिसांची अडचण झाली आहे.परिमंडळ १ च्या अखत्यारीत कुलाबा, डोंगरी आणि आझाद मैदान हे पोलीस विभाग येतात. या परिमंडळातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार यापुढे कुठल्याही पोलिसाला परस्पर सुट्टी घेता येणार नाही. आजारी असल्यास त्याने सहाय्यक पोलीस आयुक्तांसमोर हजर राहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त आजारी असल्याची शहानिशा करतील आणि मग उपायुक्तांची परवानगी घेऊनच त्याला सुट्टी मिळू शकेल.अनेक पोलीस आजारी असल्याची नोंद डायरीत करून परस्पर सुट्टी घेतात. नंतर त्यांना कामावरही हजर करवून घेतले जाते. हे गैरप्रकार रोखण्यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. मुळात ३० मार्च २०१३ रोजी हे परिपत्रक काढण्यात आले आहे. यापूर्वीही डिसेंबरमध्ये पत्रक काढण्यात आले होते. पण तरीही असे प्रकार सुरूच होते. त्यामुळे नव्या पत्रकात अशा पोलिसांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जर कुणी आजारपणाचे कारण सांगून परस्पर डायरीत नोंद करून सुट्टी घेतली आणि कामावर रुजू झाले तर हजर करून घेणाऱ्या अधिकाऱ्यावरही ‘कायदेशीर’ कारवाई केली जाईल असे या पत्रकात म्हटले आहे. एखादा पोलीस रुग्णालयात असला तरी त्याची खात्री करून घेण्याचे आदेशही वरिष्ठ पोलिसांना पत्रकात देण्यात आले आहेत. या उताऱ्यामुळे आजारपणाचे सोंग घेणाऱ्यांना वचक बसणार असला तरी खरेखुऱ्या आजारी पोलिसांची अडचण झाली आहे. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाणार की साहेबांकडे, असा सवाल येथील पोलीस करत आहेत.