राज्य सरकारने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख होण्यासाठी सुरू केलेल्या ‘लेक शिकवा’ अभियानाची सुरुवात आज नगर शहरातील रूपीबाई बोरा विद्यालयातील मुलींनी ‘पदवीपर्यंत शिक्षण न सोडण्याची’ प्रतिज्ञा करून व तशी घोषणा देत करण्यात आली.
दि. ३ ते २६ जानेवारी दरम्यान हे अभियान शाळांमधून राबवले जाणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या या अभियानाची सुरुवात बोरा विद्यालयातील कार्यक्रमाने करण्यात आली. अभियान काळात प्रत्येक शाळास्तरावर लोकसहभागातून गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप, कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा गौरव, परिपाठाच्या वेळी प्रेरणादायी मुलींच्या मुलाखती, शाळाबाह्य़ मुलींच्या पालकांच्या गृहभेटी, स्थलांतरित मुलींच्या पालकांचे समुपदेशन, पदवीधर होईपर्यंत शिक्षण न सोडण्याची प्रतिज्ञा, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष कार्य करणा-यांचा गौरव आदी विविध उपक्रम होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद व अरुण धामणे, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले व निर्मला साठे, जिल्हा समन्वयक पद्मावती गायकवाड, मुख्याध्यापिका मावची आदी उपस्थित होते. राजळे यांनी शाळेच्या राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवणा-या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. धामणे यांनी उदाहरणे देत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले. मनीषा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.