वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जळालेल्या अवस्थेत सात दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या बिबटय़ाच्या पिल्लाचा आज सकाळी नागपूरला उपचारासाठी हलविण्यात येत असताना रस्त्यात मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या पिल्लाला नागपूरला हलविण्याची सूचना चार दिवसापूर्वी केली होती. परंतु, वनाधिकाऱ्यांनी ही सूचना धुडकावून लावली होती.
 सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या निफंद्रा येथे एका सिमेंटच्या पाईपमध्ये बिबटय़ाची दोन पिल्ले कुटुंबीयांसोबत वास्तव्य करीत होती. १६ एप्रिलच्या सायंकाळी गावातील काही विघ्नसंतोषी लोकांना बिबटय़ाची दोन पिल्ले खेळताना दिसली. ही माहिती वन खात्याला देण्याऐवजी गावकऱ्यांनी या पिल्लांना सिमेंटच्या पाईपमध्ये कोंडून जाळले. यातील एका दोन महिन्याच्या पिल्लाचा तिथेच मृत्यू झाला तर दुसरे पिल्लू गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होते. जखमी पिल्लाला चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत आणण्यात आले, तेव्हापासून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कडूकर, डॉ. धांडे व डॉ. सोनकर त्याच्यावर उपचार करीत होते. अतिशय नाजूक स्थिती बघून डॉ. कडूकर यांनी उपवनसंरक्षक विनयकुमार ठाकरे यांना त्याला नागपूरला तातडीने हलविण्याची सूचना केली होती. मात्र उपवनसंरक्षक ठाकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची ही सूचना अक्षरश: धुडकावून लावली. दरम्यानच्या काळात पिल्लाची प्रकृती अधिकच खालावली. पिल्लाला अतिशय निर्दयपणे जाळण्याचा प्रयत्न झाल्याने त्याचे शरीर अक्षरश: भाजलेले होते. पिल्लाने दूध, पाणी सोडल्यानंतर उपचाराला प्रतिसाद नव्हता.
अशातच तब्बल आठवडाभराच्या कालावधीनंतर आज प्रकृती अतिशय चिंताजनक झाली असताना पिल्लला नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एका खासगी वाहनाने पिल्लाला नागपूर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात येत असताना रस्त्यात जाम-बुटीबोरीदरम्यान या पिल्लाचा मृत्यू झाला. वन कर्मचाऱ्यांनी पिल्लाच्या मृत्यूची माहिती उपवनसंरक्षक ठाकरे यांना दिली. त्याच्या पार्थिवावर वरोरा येथेच अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश देण्यात आले. शवविच्छेदनानंतर या पिल्लाच्या पार्थिवावर वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पिल्लांना जाळल्याप्रकरणी निफंद्रा येथील फुलझेले व देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.