तालुक्यातील बाभुळवंडी शिवारातील बागलदरा वस्तीजवळील जंगलात नरभक्षक मादी बिबटय़ास अखेर वन खात्याने रविवारी जेरबंद केले असून, त्यास संगमनेर येथील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. बाभुळवंडी येथील रामदास लक्ष्मण भवारी याच्या झापात पहाटे ३ वाजता या मादी बिबटय़ाने घुसून त्याची चार वर्षांची मुलगी अश्विनी भवारीस भक्ष्यस्थानी केले होते. हा मादी जातीचा बिबटय़ा असून त्याचे वय पाच वर्षे असल्याची माहिती वन विभागाने दिली. दहा दिवसांपासून वन विभागाने तीन पिंजरे लावून, ६ कर्मचारी तैनात केले होते. अखेर रविवारी पहाटे पावणेचार वाजता बिबटय़ा पिंजरात अडकला व वन खात्याने या मादी बिबटय़ाला जेरबंद केले. यासाठी वरिष्ठ वन अधिकारी एस. जे. फटांगरे, जे. डी. गोंदके, वनपाल मनसुख बेनके, पारधे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही मादी तिच्या दोन बछडय़ांसह परिसरात संचार करत होती. नियमानुसार मृत अश्विनीच्या पालकांना पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव वन खात्याने वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती फटांगरे यांनी दिली.