गेल्या दशकभरात ज्या तालुक्यात मुलींची संख्या कमी होती, त्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आता गावागणिक वीसएक घोडनवरे बाशिंग बांधून तयार आहेत. या घोडनवऱ्यांसाठी वडीलधारी मंडळी गावोगावी निरोप पाठवितात. विवाह जमावे म्हणून जमेल त्या गावी गुपचूप चक्कर मारून येतात. ‘हुंडा-िबडा काय घेत नाही कोणी’, असे आवर्जून सांगतात. हुंडय़ाची कुप्रथा मोडित निघाली असली तरी घोडनवऱ्यांचे करायचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या तालुक्यात आजघडीला एकही सोनोग्राफी केंद्र सुरू नाही. तरी माळेवाडी नावाच्या गावात मागील वर्षभरात मुलगी जन्माला आली नाही, हे विशेष.
पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर व राज्यमंत्री सुरेश धस यांच्या मतदारसंघातील सीमारेषेवर असणाऱ्या माळेवाडी नावाच्या गावात जाण्यासाठी रस्ता असा नाहीच. बलगाडीच्या चाकांच्या रेघांवरून दुचाकी पळविणारा तरबेज असेल तरच गावातील दोन वस्त्यांवर पोहोचता येते. मुलींची संख्या कमी होण्याच्या समस्येवर शेती करणारे हरिभाऊ कातखडे म्हणाले, ‘आमचे घर पाच भावांचे. म्हणजे वडिलांना चार भाऊ. पुढे आम्ही चौघे झालो. त्या पकी फक्त मला मुलगी झाली. ती सातवीत आहे. बाकी सगळ्यांना मुलेच.’ २० जणांच्या कातखडय़ांच्या घरात केवळ एकच मुलगी आहे.’ आता वातावरण बदलत आहे. या गावातील अंगणवाडी ताई म्हणाल्या, ‘आता मुलींची संख्या वाढली आहे. जेवढे मुले आहेत, तेवढय़ाच मुली आहेत. पण या वर्षी जेवढय़ा जणी प्रसूत झाल्या, त्यांना मुलेच झाली. आता बीडला जाऊन मुलगा की मुलगी हे तपासायची सोय राहिली नाही. पण गावात घोडनवरे आहेत.’
  या भागात शांतीवन नावाची अनाथ आणि तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी शाळा चालविणारे दीपक नागरगोजे म्हणाले, मुलींची संख्या कमी असण्याचा आणि या भागातील अर्थकारणाचा मोठा संबंध आहे. दोनपेक्षा अधिक मुली झाल्या तर नुकसान, अशी मानसिकता आहे. कारण प्रत्येक मुलीचा विवाह करायचे म्हणजे लाख-दोन लाख लागतात. ऊसतोड करणाऱ्यांना पूर्वी ही रक्कम अधिक वाटायची. कारण ऊसतोडीचा दर कमी होता. आता हे दर तुलनेने वाढले आहेत. सोनोग्राफी सेंटर बंद झाल्याने ० ते ६ वयोगटातील मुलींचा जन्मदर वाढला आहे. पण घोडनवरे गावोगावी आहेत. ती नवीच समस्या आहे.
 तालुक्याचा जन्मदर जाहीर झालेला असला तरी दर महिन्याला प्रत्येक गावातून मुलीचा जन्म झाला की नाही, याची माहिती घेतली जाते. प्रबोधनाच्या नावाखाली काही उत्सवी कार्यक्रमही झाले. जन्मदर वाढल्याचा दावाही केला जातो.  शिरूर तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यां म्हणाल्या, सगळ्या सरकारी यंत्रणेला आम्हीच माहिती देतो. गावात कोण महिला गरोदर हे चौथ्या महिन्यात कळविले जाते. आता सोनोग्राफी केंद्र बंद असल्याने मुलींची संख्या वाढते आहे, पण समस्या कायम आहे. कारण ज्या महिलांना पूर्वी चार मुली आहेत, त्यांनी अजूनही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नाही. घोडनवऱ्यांची संख्या वाढलेली आहेच. मुलांची हावही तशी थांबलेली नाही.