‘स्वप्नांच्या पायरीवरती
दिव्याचा प्रकाश पसरू दे
समृध्दीच्या हवेवरती
आकाशकंदील झुलू दे..
किंवा
तुझ्या मैत्रीचं नातं या दिवाळीसारखंच आहे
आनंद व सौख्याची उधळण करणारं.
आपल्या आप्तजनांना दीपावलीनिमित्त भेटकार्डामार्फत काव्यमय शुभेच्छा देण्यासाठी बाजारपेठेत माहोल तयार झाला असला तरी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची संक्रांत
ज्या पध्दतीने शुभेच्छापत्रांवर आली, तशीच ती दैनंदिन वापरातील रोजमेळ, खतावणींवरही आली असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दीपोत्सवात जशी सप्तरंगाची उधळण होते, त्याप्रमाणे विविध प्रकारच्या शुभेच्छापत्रांच्या माध्यमातून ‘शब्द मैफल’ ही जमते. दर्दी ग्राहकांची ही आवड लक्षात घेत विक्रेत्यांनी मित्र, वरिष्ठ, हितचिंतक तसेच नातेवाईकांना खास शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छापत्र बाजारात आणले आहेत. विशेषत ‘झाले गेले विसरून जा’ किंवा जुन्या आठवणींची ओंजळ जपणाऱ्यांनाही या माध्यमातून साद घालण्यात आली आहे. आपल्या आप्तेष्ठांना ‘आरोग्यपूर्ण, भरभराटीची दिवाळी जाओ’ असा संदेश देणारी विविध आशयाची इंग्रजी, हिंदी व मराठीतील शुभेच्छापत्रे बाजारात दाखल ़झाली आहेत. यामध्ये काव्यपंक्ती, देवदेवतांची चित्रे, मंगलदीप किंवा अगदी एखाद्या रंगीत कॅरीकेचरचा वापर मुखपृष्ठावर करण्यात आला आहे. अगदी आठ रुपयांपासून थेट १०० रुपयांपर्यंत यांचे दर आहेत. मात्र ग्राहकांनी ‘शब्द-भावनाच्या’ या नजराण्याकडे अद्यापही लक्ष दिले नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लघुसंदेश किंवा इ-मेलच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाण घेवाण सहज झाल्याने शुभेच्छापत्राची मागणी घटली असल्याचे ‘घटिका’चे गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, आपले व्यावसायिक हितसंबंध सुदृढ रहावेत, हितचिंतकांना दीपावली शुभेच्छा देण्यासाठीही घाऊक प्रमाणात शुभेच्छापत्र घेण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे. ही घाऊक स्वरूपातील शुभेच्छापत्रे २०० रुपयांपासून शेकडा दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
शुभेच्छापत्राप्रमाणेच लक्ष्मीपूजनासाठी खास मान असलेल्या खतावणी किंवा रोजनिशीची मागणी सध्या घटली आहे. यामध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार पॉकेट आकारातील रोजमेळीसह लहान, मोठय़ा स्वरूपातील खतावणी, असे विविध प्रकार १० पासून १३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लक्ष्मी, गणपती व सरस्वती यांच्या प्रतिमा असलेल्या खतावणीत दैनंदिन रोजमेळास काही खास नोंदणी करण्याची व्यवस्था आहे. दैनंदिन व्यवहारात संगणकाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे मोठय़ा रोजनिशी व खतावण्यांची मागणी पूर्णत: घटली आहे. ग्राहकांकडून केवळ पूजेसाठी छोटय़ा आकारातील रोजनिशी किंवा खतावणीची मागणी केली जात असल्याचे भारत बुक डेपोचे रामदास सोमवंशी यांनी सांगितले. त्यातही ग्रामीण भागातील लोकांकडूनच विशेषत विचारणा होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किंमतींमध्ये १५ टक्यांनी वाढ झाली असून कागदाच्या वाढलेल्या किंमती यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले.