काही नेत्यांची सवयच त्यांची ओळख बनते. प्रत्येक कार्यक्रमाला नियोजित वेळेपेक्षा काही तास हमखास उशिरा येणारे म्हणून भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांची सर्वत्र ख्याती. कार्यकत्रे व जनतेलाही त्यांची ही सवय अंगवळणी पडली असल्याने मुंडेंना ‘लेट लतीफ’ हे बिरूदही लावले जाते. बुधवारी मात्र यास छेद गेला. राष्ट्रीय ग्रामीण अभियान बठकीला सकाळी ११ वाजता मुंडे नियोजित वेळेत हजर झाल्याने कार्यकर्त्यांची दांडीच उडाली. पुढे लवकर जायचे असल्याने वेळेवर आल्याचे त्यांनी सांगितले, ते वेगळे.
मुंडे यांची प्रत्येक कार्यक्रमातील हजेरी नियोजित वेळेपेक्षा उशिरानेच असते. कोणालाच नाराज न करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ऐनवेळीच अनेक कार्यक्रम घेतले जातात. परिणामी मुख्य कार्यक्रमाला उशीर होतो. प्रचारसभांच्या काळात तर उशिरा येण्याचे विक्रमच होतात, पण लोकही मुंडे उशिरा येतात हे गृहीत धरूनच वाट पाहतात. त्यांच्या या सवयीमुळे वेळेवर येणाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत होते. त्यामुळेच त्यांना ‘लेट लतीफ’ हे बिरूद चिटकवले गेले.
या पाश्र्वभूमीवर बुधवारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान खर्च आढावा बठक नियोजन समिती सभागृहात आयोजित केली होती. बैठकीची वेळ अकराची होती. बठकीचे अध्यक्षस्थान मुंडे यांच्याकडे होते. मुंडे येणार असल्याने प्रशासनाने तयारी केली होती. पण नेहमीप्रमाणे किमान दोन तास उशिरा येतील, हे कार्यकत्रे गृहीत धरून होते. मात्र, मुंडे साडेदहा वाजताच शहरात दाखल झाले व वेळेवर ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्या वेळेवर येण्यामुळे कार्यकर्त्यांची मात्र धांदल उडाली. तब्बल चार वर्षांंनंतर मुंडे शासकीय बठकीला हजर राहिले. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर या वेळी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी गोवर्धन डोईफोडे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. मागच्या वर्षी मंजूर २२ कोटी खर्च झाले. चालू वर्षी ३० कोटी मंजूर आहेत. जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ३३ व कर्मचाऱ्यांच्या १८५ जागा रिक्त असल्याने काम अवघड झाल्याचे सांगितले. या जागा भरण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही मुंडे यांनी दिली.