राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सूर
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर पुन्हा आघाडी झाली तरी निदान नवी मुंबईकरिता ती करू नये, अशी मागणी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. मंगळवारी वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या पदाधिकारी बैठकीत ही मागणी करण्यात आली. सिडकोत राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव अध्यक्ष असून, त्याचा पक्षाला काहीही उपयोग होत नाही. त्यांच्या उपस्थितीतच सिडकोने तीन एफएसआयचा पालिकेला खोडा घालणारा प्रस्ताव पाठविला, असा आरोप यावेळी करण्यात आला. पदाधिकाऱ्यांची ही गाऱ्हाणी अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घालणार असल्याचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी यावेळी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने उपाध्यक्ष वाणी यांना नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर या दोन मतदारसंघांसाठी निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी सोमवारी नवी मुंबई अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर, कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार, पालिकेतील पदाधिकारी, आमदार संदीप नाईक आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे वाढलेले मताधिक्य सिडको आणि काँग्रेसमुळे वाढल्याचे या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. सिडकोकडे मोडकळीस आलेल्या इमारतींना अडीच एफएसआय देण्याचा प्रश्न गेली १९ वर्षे प्रलंबित आहे, पण तो न सोडविता त्यातील तिढा वाढविण्यात आला आहे. सिडकोकडील भूखंड हस्तांतरण, गावठाण विस्तार, त्यांना वाढीव एफएसआय यासारखे सर्व विषय सिडकोमुळे प्रंलबित असून त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसल्याचे निदर्शनास आणण्यात आले. वाशीतील नगरसेवक किशोर पाटकर यांनी तर सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव हटाव राष्ट्रवादी बचाव अशी भूमिका मांडली. याच पाटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर वाशी येथील भावे नाटय़गृहात हिंदुराव यांना जाब विचारला होता. वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींवर पाटकर यांनी तीन याचिका दाखल केलेल्या आहेत. सिडकोतील निर्णय विलंबाच्या तक्रारीबरोबरच काँग्रेसबरोबर आघाडी करूनदेखील काँग्रेसचे स्थानिक पुढारी राष्ट्रवादीच्या विरोधात काम करीत असल्याने ती नसल्यास योग्य होईल, असे स्पष्ट करण्यात आले.