तरुणाच्या खूनप्रकरणी येथील दोघा आरोपींना बुधवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर तिसऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निदरेष मुक्तता करण्यात आली. संदीप रघुनाथ पाटील व अमीन इब्राहिम शेख अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. न्या. ए. बी. पळसुले यांनी आज ही शिक्षा सुनावली. मंगेश पिसाळ याच्या गाजलेल्या खूनप्रकरणी कोणता निकाल लागणार या अपेक्षेने न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.
आरोपी संदीप पाटील, अमीन शेख, नजीम रफीक नाईकवडी आणि मंगेश ऊर्फ िपटू श्यामराव पिसाळ हे सर्वजण लक्षतीर्थ वसाहत येथे राहावयास होते. संदीप पाटील याच्याशेजारील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तो खासगी सावकारी करीत होता. संदीपचे अनैतिक संबंध मंगेश पिसाळ याला मान्य नव्हते. त्यावरून तो विरोध करीत होता.
हा राग मनात ठेवून संदीप पाटील याने अमीन शेख व नजीम नाईकवडी यांच्या सहकार्याने पिसाळ याचा काटा काढण्याचे ठरविले. २१ फेब्रुवारी २०१० रोजी संदीप पाटील याने पिसाळला गंगावेस येथे बिअर पिण्यासाठी बोलविले. तो आल्यानंतर त्याला घेऊन ते एका शेतात गेले. तेथे मंगेशच्या डोळय़ांत मिरचीपूड टाकण्यात आली. पाठोपाठ तलवार, जांबियाने सर्वागावर वार करण्यात आले. त्यामध्ये तो जागीच ठार झाला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात सुनावणी दरम्यान २६ साक्षीदार तपासण्यात आले. आज न्यायालयाने वरीलप्रमाणे दोघा आरोपींना जन्मठेप व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.