पारधी समाजातील रीतीरिवाजानुसार जावयाकडून सास-यांना लग्नात हुंडा दिला नाही म्हणून जावयाचा छळ करून निर्घृणपणे खून केल्याबद्दल सास-यासह दोघांना सोलापूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
मृताचा सासरा राजा ईश्वर शिंदे (वय ५७, रा. काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) व त्याचा मेहुणा विजय रूपचंद ऊर्फ सुबराव काळे (वय ४७, रा. धायटी, ता. सांगोला) अशी जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे गेल्या २६ मे २०१३ रोजी श्रावण गोपू भोसले (वय ३५) याचा त्याचा सासरा राजा शिंदे व विजय काळे या दोघांनी तीक्ष्ण शस्त्रांनी खून केला होता. दुर्दैव म्हणजे मृत श्रावण हा मुका व बहिरा होता. तर त्याची पत्नी प्रियांका ही त्या वेळी गरोदर होती. परंतु केवळ पैशासाठी राजा शिंदे याने आपल्या स्वत:च्या मुलीच्या भवितव्याचा विचार न करता जावयाचा खून केल्याचे दिसून आले.
मृत श्रावण याने सासूला अकरा हजारांचा हुंडा देऊन प्रियांकाबरोबर विवाह केला होता. त्यास दोन मुले आहेत. परंतु त्यानंतर त्याचा सासरा राजा शिंदे याने आणखी २५ हजारांच्या हुंडय़ाची मागणी करीत मुलगी प्रियांका हिला जावयाकडून बळजबरीने बोलावून घेतले. तेव्हा जावयाने जादा हुंडा देण्याचे कबूल करून पत्नीला पाठवून देण्याबाबत कळविले. त्यानुसार प्रियांका हिला घेऊन तिचे वडील व इतर आरोपी विंचूर येथे जावयाच्या घरी आले असता जावयाने १५ हजारांची रक्कम दिली व उर्वरित १० हजारांच्या हुंडय़ाची रक्कम देण्याकरिता १५ दिवसांची मुदत मागितली. परंतु त्यास नकार देत सासरा राजा शिंदे याने भांडण काढले व त्यातून जावयाचा खून केला, असा सरकार पक्षाचा आरोप होते. या खटल्यात सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी देशपांडे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी प्रियांका व तिची सासू यांच्यासह वैद्यकीय अधिका-यांची साक्ष घेतली. तर आरोपींतर्फे अ‍ॅड. सुरेश पाटील-कुरुलकर व अ‍ॅड. राजेंद्र बायस यांनी बाजू मांडली.