वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी म्हाताऱ्या गृहस्थाची भूमिका करत हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा श्रीगणेशा करणाऱ्या अनुपम खेर यांच्या आयुष्यात खरोखरच एक दुर्दैवी घटना घडली. त्या काळात विविध आत्मचरित्रांनी, प्रेरणादायी कथांनी त्यांना आधार दिला. आणि मग त्यातून बाहेर पडल्यानंतर आपली गोष्टसुध्दा लोकांना प्रेरणा देईल अशा पध्दतीने का नाही मांडता येणार?, या विचाराने पछाडलेल्या अनुपम खेर यांनी ‘कुछ भी हो सकता है’ या आत्मचरित्रात्मक नाटकाची सुरूवात केली होती. फिरोज अब्बास खान दिग्दर्शित या आत्मचरित्रात्मक नाटकाचे तीनशे प्रयोग पूर्ण झाले आहेत. मात्र याची जागतिक विक्रम म्हणून नोंद होणार नसल्याबद्दल अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली आहे.
‘अपयशही साजरे केले जाऊ शकते असे मला वाटते. माझा हाच विचार मला ‘कुछ भी हो सकता है’ नाटकातून लोकांपर्यंत पोहोचवायचा होता. माझे नाटक एखाद्या आत्मचरित्राइतकेच प्रभावी असेल हे माझ्या मनात पक्के होते. आज तीनशे प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर माझा हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात मला निश्चित यश मिळाले आहे’, असे मत अनुपम खेर यांनी तीनशेव्या प्रयोगाच्या निमित्ताने व्यक्त केले. मात्र, या अशा वेगळ्या प्रकारातील नाटकाचे तीनशे प्रयोग पूर्ण होतात, याची दखल जागतिक विक्रम म्हणून घेतली जावी, या हेतूने त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे विचारणा केली. मात्र, अशाप्रकारे आत्मचरित्रात्मक नाटकाचे तीनश प्रयोग जगभरात कुठे झाले आहेत का?, हे शोधणे अशक्य असल्याने जागतिक विक्रमासाठी या त्रिशतकी प्रयोगाची नोंद होऊ शकणार नाही, असे गिनीज बुककडून स्पष्ट करण्यात आल्याचे खेर यांनी सांगितले. पण, म्हणून आपण प्रयोग थांबवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एनसीपीएमध्ये आपल्या चाहत्यांसाठी ‘कुछ भी हो सकता है’चा तीनशेवा प्रयोग सादर करणाऱ्या अनुपम यांनी आपल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले. माझ्या २६ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीतील ४७९ चित्रपटातील अभिनयाने जे सुख-समाधान मला मिळवून दिले नाही ते या एका नाटकाने दिले, असे सांगणाऱ्या अनुपम खेर यांनी आपले नाटक लोकांच्या यशापेक्षा अपयशाबद्दल जास्त बोलते म्हणूनच ते त्यांना जास्त प्रभावी वाटत असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. या नाटकाने माझे आयुष्यच बदलले कारण, इथे मी माझ्या यशाची नव्हे अपयशाची, चुकांची चर्चा करत होतो. तुम्ही जेव्हा आपल्या चुकांबद्दल परखडपणे लोकांसमोर बोलता तेव्हा मनात कुठलीच भीती उरत नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.