समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आयुष्य वेचलेल्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्कार देणे समजू शकतो. परंतु तीन पिढय़ांच्या हिश्श्याचे पाणी वापरून व्यवसाय करणाऱ्या तरुण व्यावसायिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, हे मात्र समजू शकत नाही. आपल्या हातून अशी निवड झाली नसती, असा उपरोधिक टोला माजी आमदार पाशा पटेल यांनी लगावला.
औशाच्या दलित, मुस्लिम, ओबीसी एकता मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त राज्यमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्या वेळी पटेल बोलत होते. साई शुगरचे अध्यक्ष राजेश्वर बुके अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एन. बी. शेख, आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील, प्रसिद्ध विचारवंत जावेद पाशा, महाराष्ट्र विकास आघाडीचे अ‍ॅड. अण्णाराव पाटील, उपनगराध्यक्ष लहू कांबळे उपस्थित होते.
माजी आमदार पटेल म्हणाले, की संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मराठवाडय़ावरही याची गडद छाया आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळात निसर्गाची अवकृपा आहे. तसेच मानवनिर्मित संकटही त्याला तेवढेच कारणीभूत आहे. पावसाचे पाणी जमिनीत अडवून जमिनीत मुरवून ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार जलसंधारणाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करते. राजस्थानसारख्या वैराण वाळवंटात पाणी अडवून, पाणी जिरवून हरितक्रांती करणारे पाणीवाले बाबा व डॉ. स्वामिनाथन यांनी लातूर जिल्हय़ात येऊन पाण्याचे व विशेषकरून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजनेचे महत्त्व पटवून दिले. दुसरीकडे ५०० ते ६०० फुटांपर्यंत जमिनीला छिद्र पाडून स्वत:चा व्यवसाय व्यवसायधारक थाटत आहेत. एवढय़ा खोलीवरील तीन पिढय़ांचे पाणी संपवणाऱ्या नवतरुण व्यावसायिकांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे आपणास तरी पटत नाही. निवड समितीवर असतो तर या पुरस्काराने अशा व्यावसायिकांना सन्मानित केले नसते, अशा शब्दांत पटेल यांनी संयोजकांनाही खडे बोल व्यासपीठावरून सुनावले.
मंत्री ढोबळे यांच्या हस्ते बोअरवेल एजन्सीचे मालक पांडुरंग चेवले, माजी नगराध्यक्ष मुजबुद्दीन पटेल, खंडूदेव कटारे, पंकज काटे, अ‍ॅड. सुरेंद्र घोडजकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मातीची तहान भागविल्याशिवाय माणसाची तहान भागवता येत नाही, असे ढोबळे यांनी या वेळी नमूद केले. दलित, मुस्लिम, ओबीसी एकता मंचचे अध्यक्ष मुज्जमीन शेख, राजीव कसबे, मुजफ्फर अली इनामदार, एन. जी. माळे, भरत सूर्यवंशी, अंगद कांबळे यांनी या कामी पुढाकार घेतला. पी. सी. पाटील, अ‍ॅड फिरोजखान पठाण यांनी सूत्रसंचालन केले.