चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवंत जाळणारा नराधम पती निलेश निवृत्ती जाधव (श्रीरामपूर) यास येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश एस. व्ही. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील एकनाथ गेंदा सोनवणे यांची कन्या ज्योती हिचा विवाह निवृत्ती जाधव यांचा मुलगा निलेश याच्याशी १७ एप्रिल २००८ रोजी झाला. काही महिन्यांनंतर निलेश त्याची आई इंदुमती व बहीण वनिता बैराणे हे तिघे मिळून ज्योतीचा छळ करू लागले. त्यांच्या मागणीनुसार एकनाथ सोनवणे यांनी निलेशला दुचाकी घेऊन दिली. मात्र त्यानंतरही तिचा त्रास कमी झाला नाही. निलेश दारू पिऊन तिला सतत मारहाण करू लागला. १८ जून २०११ रोजी रात्री निलेश दारू पिऊन आला. ज्योतीस मारहाण करून तिच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.  आसपासच्या लोकांनी तिला जखमी अवस्थेत येथील कामगार रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. सरकारी वकील भानुदास तांबे यांनी याप्रकरणी रिवद्र सोनवणे, उषा सोनवणे, अनिता सोनवणे, सुभाष कदम, एकनाथ सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण आघाडे, डॉ. उल्हास गोणाडी, नानासाहेब गाडे यांच्यासह १५ साक्षीदार तपासले. अ‍ॅड. तांबे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश कुलकर्णी यांनी निलेश यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.