वेळ काढून ग्रंथवाचन केल्यास जीवनाला योग्य दिशा व गती मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले.
डॉ. किसनमहाराज साखरे यांनी लिहिलेल्या ब्रम्हसूत्र भाष्य या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश कि. पु. जोशी होते. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अॅड. अण्णाराव पाटील, अशोक शास्त्री, केशव कोद्रे पाटील, वामनाचार्य जोशी, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी उपस्थित होते. न्या. जोशी म्हणाले की, दैववादावर विश्वास न ठेवणारा माणूस दैवत्व नाही हेही ठाम सांगू शकत नाही. ईश्वराची आठवण एक तर संकटसमयी किंवा फावल्या वेळात होते. माणसाने वेळ काढून ग्रंथांचे वाचन करणे आवश्यक आहे.
साखरेमहाराज म्हणाले, सर्व भाषांचा उगम संस्कृतपासून झाला आहे. अनेक ग्रंथांचा अभ्यास करून ब्रम्हसूत्र भाष्य हा ग्रंथ मराठीत उपलब्ध करून दिला आहे. कुठल्याही कर्माविषयी आपण स्वत:ला दोष देतो. पण प्रत्यक्षात कर्म हे शरीर किंवा इंद्रियाच्या हातून घडत असते. आत्म्याचे खरे स्वरूप या ग्रंथाद्वारे समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानेश्वरी देशभर पोहोचावी, या साठी ती िहदी भाषेतून लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अरुण माळी यांनी, सूत्रसंचालन अप्पाराव पाटील यांनी केले. समारोप के. पी. जोशी यांनी केला. आभार अॅड. संजय पांडे यांनी मानले.