विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी तर्फे देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार नीला सत्यनारायण, प्रभाकर वैद्य, संदीप वासलेकर, संजय पुरी, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक सचिन इटकर उपस्थित होते. या पुरस्काराचे वितरण शनिवारी (२९ डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्रिपुरा राज्याचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, डॉ. डी. वाय. पाटील सोसायटीचे सचिव सोमनाथ पाटील हे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे महासचिव ‘पद्मश्री’ प्रभाकर वैद्य, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर, ‘अलायन्स फॉर यू. एस. इंडिया बिझनेस’ चे अध्यक्ष संजय पुरी आणि ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना देण्यात येणार आहे.