जादूटोणाविरोधी विधेयक कायद्यात रूपांतरित व्हावे यासाठी विधानसभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी ‘चला विवेकाचा आवाज बुलंद करू’ या निर्धार परिषदेत केले.
महाराष्ट्र अं.नि.स.ने ही निर्धार परिषद अंनिसचे राज्य सचिव माधव बावगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उद्घाटन आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्य सरचिटणीस शहाजी भोसले आणि गजेंद्र सुरकार उपस्थित होते. या वेळी आमदार बोंद्रे म्हणाले, डॉ. दाभोलकरांनी समाजात जी विवेकाची ज्योत प्रज्वलित केली ती सतत तेवत ठेवण्यासाठी आघाडी सरकारने जादूटोणाविरोधी अध्यादेश काढून डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा सन्मानच केला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करेल.
यासाठी विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळविण्यासाठी या निर्धार परिषद झाल्याचे विदर्भ सचिव गजेंद्र सुरकर यांनी सांगितले. या वेळी डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे, प्रा. कि. वा. वाघ, प्रा. इंदू लहाने, शाहिन पठाण, अ‍ॅड. बाळासाहेब भोंडे, महादेव हुडेकर, शिवाजी पाटील, पंजाबराव गायकवाड, सज्जभाई अन्सारी, सुरेश साबळे, प्रशांत सोनुने उपस्थित होते.
राज्य शासनाने जादूटोणाविरोधी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे, यासाठी १० डिसेंबरपासून विधानसभेबाहेर महाराष्ट्र अंनिसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती या वेळी दिली. निर्धार परिषदेत मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रलांजेवार, तर आभार रणजितसिंग राजपूत यांनी मानले.