गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी रोषणाईचे जाहीर प्रदर्शन मांडून गणेशभक्तांना आकर्षिण्याचा प्रयत्न चालविला असला तरी अनेक मंडळांनी दहा दिवसांच्या उत्सवासाठी अस्थायी स्वरुपाची अधिकृत वीज जोडणी करून न घेतल्याने अशा मंडळांविरुद्ध महावितरणने मोठी मोहीम सुरू केली आहे. शहरात १०३२ नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे असून मिळालेल्या माहितीनुसार फक्त २४० मंडळांनी तात्पुरती अधिकृत वीज जोडणी करून घेतली आहे. उर्वरित गणेश मंडळांच्या रोषणाईचा झगमगाट अनधिकृत वीज वापरून सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने महावितरण आणि स्पँकोने वीज उपकेंद्रावरील सर्व कनिष्ठ अभियंत्यांना गणेश मंडळांच्या वीज जोडणीची तपासणी सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत. यात ‘दामिनी दस्ता’ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे समजते. त्यामुळे वीज चोरणाऱ्या गणेश मंडळांच्या रोषणाईवर टांच येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक गणेश मंडळांनी विजेच्या खांबांवरून थेट जोडणी करून रोषणाईचा डोलारा उभा केला आहे. हा उधारीचा झगमगाट आता महावितरण आणि स्पँकोच्या रडारवर आला असून धडक कारवाई सुरू होणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. यावर्षी अशा वीज चोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडायचे नाही, अशा स्पष्ट सूचना महावितरणने संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बेकायदेशीर वीज जोडण्यांमुळे आग लागणे, विजेचा शॉक बसणे किंवा एखादा तत्सम अपघात किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे गांभीर्य नसलेली अनेक गणेश मंडळे हा जीवघेणा प्रकार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई आवश्यक असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. अशी कारवाई सुरू झाल्यास रात्रीच्या वेळी गणेश मंडळांच्या मंडपात दिसणारा झगमगाट अंधारात परावर्तित होऊ शकतो.
अनधिकृत वीज जोडणी घेणे हा कायद्याने गुन्हा असून मंडळांनी रितसर अर्ज करूनच वीज जोडणी करून घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे वारंवार करण्यात आले होते. तरीही फक्त २४० मंडळांचेच अर्ज महावितरणकडे आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर्षी बिग बजेट गणेश मंडळांवर महावितरणने लक्ष्य केंद्रित केले असून या मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असेच एकंदर चित्र दिसून येत आहेत. महावितरणने काँग्रेस नगर विभागात ९५ कनेक्शन दिले आहेत. स्पँकोने गांधीबाग, सिव्हिल लाईन्स, महाल या विभागात १४५ कनेक्शन दिल्याचे सांगण्यात आले. अनधिकृत वीज कनेक्शन घेतल्याचे आढळल्यास मंडळांवर गुन्हा नोंदवून २००३च्या वीज कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन मंडळाची वीज कापली जाणार आहे.