शारदीय नवरात्रोत्सवात श्रीपूजक मंडळाच्या वतीने प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव तथा दत्तात्रय ठाणेकर यांनी बुधवारी दिली. दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी मंदिरातील विद्युतरोषणाईचे काम पूर्ण झाले असून, मंदिर रोषणाईने उजळले आहे.    
श्रीपूजक मंडळ, व्हाईट आर्मी व रोटरी क्लब सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव काळात विद्यापीठ हायस्कूलसमोर मोफत वैद्यकीय मदत केंद्र सकाळपासून ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत सुरू राहणार आहे. मंडळाची रुग्णवाहिका भक्तांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. मंदिराच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाबरोबर श्रीपूजक मंडळही दक्ष आहे. मंडळाच्या वतीने गाभाऱ्यात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून पाच वॉकीटॉकी सेटही उपलब्ध केले आहेत. पितळी उंबरठय़ापासून आत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर तो बाहेर पडेपर्यंत नजर ठेवणे हा या यंत्रणेमागचा उद्देश आहे.    दस-याच्या दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजन करण्याचा उपक्रम यंदाही सुरू राहणार आहे. काही बँकांच्या सहकार्याने श्रीपूजक मंडळाने करवीरनगरीत प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्या भाविकांना मोबाइल बँकिंग व नेट बँकिंगच्या माध्यमातून अभिषेक, नैवेद्य इत्यादीसाठी शुल्क स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.    गेले आठवडाभर सुरू असलेले मंदिरातील स्वच्छतेचे कामकाज पूर्ण झाले आहे. दीपमाळ, शिखर, बाहय़शिल्प, गरुड मंडप व अन्य ठिकाणची स्वच्छता, रंगरंगोटी ही कामे पूर्ण झाली आहेत. दर्शन रांगमंडप उभारणीच्या कामाला गती आली आहे. देवीचे दर्शन व्यवस्थित मिळावे यासाठी एलसीडी स्क्रीनची सोय केली आहे.
अंबाबाईच्या नऊ रूपांतील पूजा
प्रतिवर्षी नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या विविध रूपांतील पूजा बांधण्याची परंपरा आहे. यंदा अश्विन शु. प्रतिपदेला (५ ऑक्टोबर)     सिंहासनारूढ पूजा बांधली जाणार असून, त्यानंतर अनुक्रमे कन्याकुमारी, सौराष्ट्रातील खोडियार माता, उमा-महेश-गणपती, ऐरावतावर आरूढ, सरस्वती, आदिमाया, महिषासुरमर्दिनी व मयूर रथारूढ (दसरा) या रूपात पूजा बांधली जाणार आहे.