निवडणूक आली, की एखाद्या समूहाला खूश करण्यासाठी एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन उरकण्याचा जुना शिरस्ता कायम ठेवताना काँग्रेस नेत्यांनी येथे ‘उर्दू घरा’च्या भूमिपूजनाचा सोहळा आटोपून घेतला. परंतु सरकारच्या या प्रकल्पाला तांत्रिक मान्यताही नाही व निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली नाही, मात्र उर्दू भाषकांवर ‘प्रभाव’ टाकण्याच्या दिशेने काँग्रेस नेत्यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचा राजकीय सूर उमटत आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. नांदेडसह अवघ्या महाराष्ट्राचे भूषण ठरलेल्या नरहर कुरुंदकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन चव्हाण यांनीच चार वर्षांपूर्वी केले, पण तेथे एका विटेचेही बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे कुरुंदकरांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली असतानाच काँग्रेस नेत्यांनी आता ‘उर्दू घर’च्या भूमिपूजनाचा घाट घातल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनी केला.
उर्दू भाषेचे जतन, संवर्धन व विकास यासाठी सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागाने ‘उर्दू घर’ ही नवी योजना समोर आणली. त्याअंतर्गत नांदेडच्या ‘उर्दू घर’ला सर्वप्रथम मान्यता मिळवून घेण्यात माजी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री यशस्वी झाले. आठ कोटी रुपये खर्चाच्या या कामास प्रशासकीय मान्यता मिळून १५ दिवसही लोटले नाहीत, तोच भूमिपूजन उरकून घेण्यात आले. साहजिकच त्यावर विरोधकांमधून हा तर ‘निवडणूक स्टंट’ असल्याचा सूर उमटला.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने पूर्वी ज्या प्रकल्पांवर ‘कुदळ’ मारली, त्या प्रकल्पांबाबत नंतर काहीच घडले नाही. १९८९च्या लोकसभा निवडणुकीआधी ‘मोदी टायर्स’ या भव्य प्रकल्पाची घोषणा झाली, पण पुढे तो प्रकल्प साकारलाच नाही. या पाश्र्वभूमीवर ‘उर्दू घर’चा कार्यक्रम घेऊन काँग्रेसने मागील पाढे पुढे सुरू ठेवण्यात स्वारस्य दाखविले आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची राज्य सरकारची योजना आहे. नांदेडसह ती कुठेही व्यवस्थित राबविली नाही. ‘उर्दू घर’ उभारणीबाबत दोन दशकांपासून आश्वासने दिली जात होती. तथापि राज्याच्या राजधानीतच ते उभारले गेलेले नाही. किंबहुना मुंबईत स्वतंत्र उर्दू भवन बांधण्याची मागणी काँग्रेस राज्यकर्त्यांनी धुडकावून लावल्याचे समोर आले. नांदेडच्या काँग्रेस नेत्यांनी केवळ प्रशासकीय मान्यतेचा आधार घेत भूमिपूजनाचा कार्यक्रम अचानक घडवून आणल्याने बांधकाम खात्याच्या यंत्रणेची सोमवारी अक्षरश: तारांबळ उडाली. एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी या खात्याकडे अधिकृत निधी नव्हता, त्यामुळे खर्चाचा भार कंत्राटदारावर टाकण्यात आला.
नियोजित उर्दू घर बांधकामासाठी नांदेड मनपाने मदिनानगर भागात जागा दिल्याचे सांगण्यात येते. त्यातील प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या जागेत एक सभागृह, दोन वर्गखोल्या, एक ग्रंथालय, ग्रंथपाल कार्यालय, अतिथिगृह आदी बांधकामे प्रस्तावित आहेत.