महाबळेश्वरच्या प्रसिद्ध लिंगमाळा धबधबा परिसराचे सुशोभीकरण, मजबुतीकरण व सुरक्षेमुळे स्वरुपच बदलले आहे. वनखात्यासह वनव्यवस्थापन समितीने यात विशेष लक्ष घालून या सुधारणा केल्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे लिंगमाळा धबधबा सध्या खास आकर्षण झाले आहे.
महाबळेश्वरातील पावसाळा म्हटले की डोळ्यासमोर येतात धो-धो कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, दाट धुके, थंडी तसेच या भागातील रौद्र वाटणारे पण तितकेच मनमोहक असणारे झरे, ओढे, धबधबे. पॉईंटचा राजा म्हणून अन्य मोसमात येथील ऑर्थरसीटला जसे संबोधले जाते, तसेच पावसाळ्यातील धबधब्यांचा राजा म्हणून लिंगमाळा धबधब्याचे नाव आहे. महाबळेश्वर शहरापासून या धबधब्याला जाण्यासाठी महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावरून जाता येते. तसेच महाबळेश्वर-केळघर -मेढा घाटापूर्वीच्या भेकवली मार्गेही जाता येते. दोन्ही मार्ग साधारणपणे ७ कि.मी अंतराचे आहेत. वनखात्याच्या ‘लिंगमाळा विश्रामगृहापर्यंत’ पोहोचल्यावर मुख्य धबधब्याकडे जाण्यासाठीच्या पायऱ्या लागतात आणि मग जंगलातील मौज अनुभवायास मिळते. पण या धबधब्याकडे जाणारा रस्ता मातीचा असल्याने तो पावसाळ्यात गाळ-चिखलाने भरून जातो. पायऱ्यांचा मार्ग नसल्याने चालता येत नव्हते. सुरक्षेसाठी कठडेही नसल्याने हा धबधबा पाहणे, त्याचा आनंद घेणेही धोकादयक बनले होते. या साऱ्या पाश्र्वभूमीवर वनखात्याच्या महाबळेश्वर विभागाने भेकवली वनव्यवस्थापन समितीच्या सहकार्याने गेल्या वर्षीपासूनच या परिसराचे सुशोभीकरण, मजबुतीकरण व सुरक्षिततेबाबतचे काम विविध तज्ज्ञांकरवी सुरू केले. नुकतेच हे काम पूर्ण झाले असून खात्याच्या या नवीन व आगळ्या वेगळ्या संकल्पनेमुळे या धबधब्याचे व त्याच्या भोवतालचे रुपडेच पालटले आहे. यामुळे पूर्वी जे पर्यटक या धबधब्यावर येऊन गेले त्यांना आत्ताचे त्याचे सुधारित रुप बघून पूर्वीचाच हा लिंगमाळा आहे का, अशी शंका आल्याशिवाय राहणार नाही.
खात्याच्या लिंगमाळा विश्रामगृहापर्यंत आल्यावर धबधब्याकडे जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग केला आहे.हा पायरी मार्ग जांभ्या दगडात बनवला असल्याने चालण्यास निर्धोक आहे. पूर्वी या वाटेवर कुठेही संरक्षक कठडे नव्हते, यामुळे कडय़ावरून जाताना घसरून पडण्याच्या घटना व्हायच्या. तसेच या कठडय़ाअभावी पर्यटकांना धबधब्याचा आनंदही घेता येत नव्हता. यासाठी नवीन सुशोभीकरणात हा संपूर्ण परिसर संरक्षक कठडे व लोखंडी पाईपच्या रेलींगने सुरक्षित केला आहे.
पूर्वी डोह ते मुख्य धबधबा यामध्ये काही पाण्याचे ओढे होते. त्यातून मुसळधार पावसात जीव मुठीत धरून पाण्यातून मानवी साखळी करून एकमेकाला आधार देत पुढे जावे लागायचे. खात्याने आता तेथेही येथील निसर्गाला व पर्यावरणाशी साजेसा असा लाल जांभ्या दगडात आकर्षक असा पूल बांधला आहे. तसेच मुख्य धबधबा पाहण्यासाठी, त्याचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी कोठेही चबुतरा नव्हता. अताा वनखात्याने पर्यटकांची ही अडचण ओळखून ठिकठिकाणी संरक्षित चबुतरे (प्लॅटफॉर्म) तयार केले आहेत. यामुळे या चबुतऱ्यावर उभे राहून हा मनोहारी लिंगमाळा धबधबा पाहणे सोपे, आनंददायी झाले आहे. या स्थळावरच पर्यटकांसाठी विश्रामगृहाबाहेर मोफत सुलभ शौचालयाची सोय केली आहे.
या सर्व कामासाठी आत्तापर्यंत वनखाते व वनव्यवस्थापन समितीने सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च केले आहेत. हे काम शांती कन्स्ट्रकशनचे डी. एल. शिंदे व नाना शिंदे यांनी आपले सर्व कौशल्य पणाला लावून मोठय़ा खुबीने केले असून यासाठीचे डिझाईन आर्किटेक्चर महेंद्र चव्हाण यांनी तयार केले आहे, अशी माहिती महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल एस. एम. खोत, भेकवली वनव्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष संजय चंदर केळगणे व सचिव वनरक्षक सुनील लांडगे यांनी पत्रकारांना दिली. मजबुतीकरण व सुशोभीकरणानंतरचा हा पहिलाच पावसाळा असल्याने त्यावर वनखाते पूर्णपणे लक्ष ठेवून असून पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत अजून काय काय करता येऊ शकते, याच्यावर विचार करीत आहे. पावसाळ्यातील हा महत्त्वाचा पॉईंट अत्यंत सुंदर व सुरक्षित झाला असून धबधब्याबरोबर १ किलोमीटर जंगल भ्रमंतीचाही आनंद घेता येत आहे.
 

Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
bullcart race sculpture created in bhosari
भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन