मद्य उद्योगातील कामगारांचे किमान वेतन १०,००० करावे या मागणीसाठी विदर्भ ब्रेव्हरीज मजदूर युनियनच्यावतीने अप्पर कामगार आयुक्त यांचे कार्यालयासमोर मद्य उद्योगातील कामगारांनी निदर्शने केली. कामगारांना १० हजार रुपये किमान वेतन मिळावे, घरभाडे भत्ता १५ टक्के मिळावा, ठेकेदारी प्रथा बंद करावी आणि गेल्यावर्षी ३१ मार्चला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या मालकांविरुद्ध कडक कारवाई करा आदी मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन केले. समस्यांचे निवेदन अप्पर कामगार आयुक्त ए.आर. लाकसवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. मागण्यापूर्ण न झाल्यास कडक आंदोलनाचा इशारा विदर्भ ब्रेव्हरीज मजदूर युनियनचे सरचिटणीस अमृत गजभिये यांनी दिला आहे.
अप्पर आयुक्तांनी मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात नागपूर डिस्टिलर्स, कोकण एग्रो डिस्टिलर्स, विदर्भ बॉटलर्स, वंदना डिस्टिलर्स, अजंता डिस्टिलर्स, रमन डिस्टिलर्स, रेनबो डिस्टिलर्सचे बबन पवार, सतीश पाईक, इंदू पवार, श्यामराव कोसारे, सुरेश कटारमल आणि उमराव गवते यावेळी उपस्थित होते.