सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त, वय अवघे ७३ वर्षे, पत्नी आणि दोन मुले असा परिवार. मात्र कौटुंबिक मतभेदामुळे काही वर्षांपासून विभक्त. त्यातूनच आलेला एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी उतारवयात सहचारिणी निवडली. पण, या सहचारिणीने त्यांना दगा दिला आणि पैशांची मौजमज्जा करून पसार झाली. तिने ठाण्यातील आणखी एका ज्येष्ठ नागरिकालाही अशाच प्रकारे गंडा घातला असून ती रात्री एकाच्या तर दिवसा दुसऱ्याच्या घरी असायची. या दोन्ही घटनांमुळे त्या वृद्धांना म्हातारपणीचा चळ अंगाशी आल्याचे उघड झाले आहे. या महिलेचा पोलिसांनी शोध सुरू केला असून त्यात मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात एक ७३ वर्षीय वृद्ध राहत असून ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहे. पत्नी आणि दोन मुलगे, असा त्यांचा परिवार आहे. कौटुंबिक मतभेदामुळे ते सध्या एकटेच राहतात. यातूनच त्यांना एकटेपणाची जाणीव होऊ लागली आणि त्यांनी उतारवयात सहचारिणीचा शोध सुरू केला. त्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. त्यानुसार, एका ५३ वर्षीय महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. साताऱ्यातील आई-वडिलांची ही एकुलती एक लेक लग्नानंतर पुण्यात स्थायिक झाली. एम कॉम, एमबीएपर्यंत शिक्षण झालेली ही महिला एका खासगी कंपनीत कामाला असून कंपनीचे काम घरातूनच लॅपटॉपवर करते. ६० ते ७० हजार रुपये महिनाकाठी पगार मिळतो. नवऱ्याचे हृदयविकाराने तर मुलाचे अपघाती निधन झाले आहे, अशी माहिती त्या महिलेने त्यांना दिली. त्याची खातरजमा न करताच त्यांनी विश्वास ठेवला आणि तिची सहचारिणी म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. ती महिला त्यांच्याकडे एक-दोन दिवस राहत असे. उर्वरित दिवशी पुण्यात राहत असे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही राहत होते. ऑगस्ट ते डिसेंबर २०१३ या कालावधीत घडलेला हा प्रकार. या महिलेसाठी त्यांनी मोबाइल, पर्स, कपडे आदी चैनी वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी तिच्यावर सुमारे एक लाख ६४ हजार रुपये खर्च केले, तसेच वसई भागात ५५० चौरस फुटाचा फ्लॅट तिच्यासाठी खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यासाठी बिल्डरला ११ हजार रुपयांचे टोकन दिले होते. एके दिवशी ती महिला पुण्याला गेली आणि परतलीच नाही. त्यांच्या मोबाइलवर दुसऱ्या महिलेच्या नावाने मॅसेज आला. त्यामध्ये तिचे हृदयविकाराने निधन झाल्याचे म्हटले होते. मात्र, ही महिला जिवंत असल्याचा त्यांचा संशय असून त्यांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलिसांकडे केली आहे. या मागे मुंबई येथील भांडुप परिसरातील टोळी कार्यरत असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे. अशीच तक्रार कळव्यातील एका वृद्धाने केली असून त्याची ४० हजारांची फसवणूक केली आहे. या दोन्ही वृद्धांची एकाच महिलेने फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जन्मकुंडली  आणि कुलदैवतेचा कौल
या वृद्धाने सहचारिणी निवडण्यासाठी आधुनिक ‘लिव्ह इन.’ पद्धत अनुसरली असली तरी हे करताना जन्मपत्रिका तसेच कुलदैवतेचा कौल घेतला होता. उतारवयात हे सर्व सोपस्कार करताना त्या महिलेने सांगितलेली जन्मतारीखही खोटीच होती. कारण तिने तिचे पॅनकार्ड कधीच दाखविले नाही, याचा साक्षात्कार त्यास ती पळून गेल्यावर झाला आहे.